खेड : खेड शहरात बहुतांश भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता पाण्याचा अपव्यय केल्यास नगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.
गृहनिर्माण संस्थांना रीतसर नोटीस बजावून पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. शहरातील काही भागात अनियमित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. साठवण टाक्या भरण्यास विलंब होत असल्याने काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तरीही पाणीपुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यासाठी नगर प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाणार आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे एप्रिल, मे महिन्यांत त्याचा फटका सर्वांना बसतो. नागरिकांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते.
शहरातील काही भागात विशेषतः गृहनिर्माण संस्थांकडून पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. गृहनिर्माण संस्थांच्या साठवण टाक्या भरल्यानंतर बंद करण्याची तसदी घेतली जात नसल्याने पाणी वाया जात आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे त्याचे महत्व वाटत नाही. पण, पाणी हे जीवन असून त्याचा अपव्यय टाळलाच पाहीजे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना दणका देण्यासाठी नगर प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांसह नागरिकांनाही आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला आता पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्यथा दंडाचा फटका सहन करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला सदस्यांची बैठक घ्यावी लागणार आहे.
व्हॉट्स अॅप ग्रुपवर देणार माहिती
पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत आता एसएमएसद्वारे नगरपालिकेकडून नागरिकांना रीतसर माहिती दिली जाणार आहे. यासाठी पालिका हद्दीतील गृहनिर्माण संस्थांसह महत्त्वाच्या व्यक्तींचा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाबाबत माहिती दिली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 25/Oct/2024












