रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सागरी सुरक्षारक्षकांचे वेतनाविना हाल

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ११० सागरी सुरक्षारक्षकांचा वेतनाचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे. सागरी सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या या रक्षकांचे गेल्या ४ महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्याच्यासह कुटुंबीयांचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत.

सागरी सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी सुरक्षारक्षकांचा पगार गेल्या चार महिन्यांपासून शासनाकडून देण्यात आलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ७० तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४० अशा एकूण ११० सुरक्षारक्षकांचे वेतन जमा होत नसल्याकारणाने हे सुरक्षारक्षक मेटाकुटीस आले आहेत. यंदा दिवाळी सणालादेखील वेतन जमा झाले नव्हते; मात्र सुरक्षारक्षकांची दिवाळी शासनाकडून मिळालेल्या बोनसवर साजरी झाली. राज्यशासनामध्ये सध्या कोकणाला दोन कॅबिनेट खाती मिळाली आहेत, मत्स्योद्योग खाते तर सिंधुदुर्गतील आमदार नीतेश राणे यांच्याकडे आहे तरीदेखील ही परिस्थिती ओढावत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण किनारपट्टी संवेदनशील मानली जाते. तसेच अवैध मासेमारी व किनारपट्टीवरील संशयास्पद गोष्टींवर नजर ठेवण्याची जबाबदारी या सुरक्षारक्षकांची आहे. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता हे सुरक्षारक्षक आपली जबाबदारी पार पाडत असतात. मात्र, गेले चार महिने थकीत वेतनाअभावी या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. याबाबत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 22-Nov-2025