रत्नागिरी : रत्नागिरी येथे नुकताच तांत्रिक कामगार युनियनचा ‘कोकणस्तरीय मार्गदर्शन मेळावा’ झाला. मेळाव्याच्या प्रास्ताविकात रत्नागिरी सर्कलचे सचिव मंगेश जाधव यांनी उर्वरीत महाराष्ट्रभर लागू करण्यात आलेले रिस्ट्रक्चरिंग, कोकणात देखील लवकरात लवकर लागू करण्यात यावे, अशी भावना व्यक्त केली. तसेच कोकणात जानेवारी महिन्यात होणारे संघटनेचे द्वैवार्षिक महाअधिवेशन, कोकणातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, कोकणातील अपुरी कामगार संख्या याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
रत्नागिरी झोनचे उपाध्यक्ष महेंद्र पारकर यांनी मनोगतात उर्वरित महाराष्ट्रात अमलात आणलेले रिस्ट्रक्चरिंग कोकणासाठी लागू करताना इथली भौगोलिक परिस्थिती, विरळ लोकवस्ती व कमी ग्राहक संख्या; परंतु त्यामानाने दऱ्या-खोऱ्यातून, नदी-नाल्यातून आणि जंगली भागातून जाणाऱ्या वीज वाहिनीचे खूप मोठे जाळे आहे. या वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती करताना लाईनस्टाफची होणारी दमछाक व त्यांच्यावर येणारा शारीरिक व मानसिक ताण याचा विचार करता कोकणसाठी ग्राहकसंख्या कमी असली तरीही रिस्ट्रक्चरिंग करताना जास्त मनुष्यबळाची आवश्यकत आहे. ग्राहकांना वेगवान सेवा देताना दुचाकी वापरावी लागत असल्याने कोकणातील लाइनस्टाफसाठी ज्यादाचा इंधनभत्ता मंजूर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोकणात इतर प्रदेशांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे व ते नियमित कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने तितकेच काम करत असल्याने समान काम समान वेतन या सूत्रानुसार त्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने विचार करावा असे विचार मांडले.
संघटनेत प्रवेश केलेल्या नवीन सभासदाना संघटना व कामाशी एकनिष्ठ रहा असे आवाहन केंद्रीय सरचिटणीस आर.टी. देवकांत यांनी केले. तसेच इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. महेंद्रजी शिवलकर यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. आभार प्रादेशिक सहसचिव संजय भोसले यांनी केले व राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली. कोकणस्तरीय मार्गदर्शन मेळाव्याला रत्नागिरी व सिंधुदुर्ग महापारेषण व महावितरण मधील बाह्यस्रोत कर्मचारी, विद्युत सहायक, तंत्रज्ञ, ऑपरेटर असे बहुसंख्येने तांत्रिक कर्मचारी व बंधूभगिनी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 22-Nov-2025














