Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझाद यांची राहुल गांधींवर टीका

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत असं म्हणत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.

गुलाम नबी आझाद आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. बिहारमधील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली. मात्र, इतर पक्ष निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या त्या राज्यामध्ये जात नाहीत. अशा कार्य पद्धतीने निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणत आझाद यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.

पहलगाममुळे जम्मू-काश्मीर अनेक वर्षे मागे गेलं

पहलगामसारख्या हल्ल्यांमुळे जम्मू-काश्मीर अनेक वर्षे मागे गेल्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

गुलाम नबी आझाद कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. त्यांनी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती, पर्यटन क्षेत्राची झालेली पडझड आणि देशातील राजकीय वातावरणावर सविस्तर भाष्य करत मुद्दे मांडले. पहलगामसारख्या हल्ल्यांमुळे जम्मू-काश्मीर अनेक वर्षे मागे गेल्याचे ते म्हणाले. या घटनेनंतर पर्यटन अचानक कोसळले, हजारो पर्यटकांनी काश्मीरच्या दौऱ्या रद्द केल्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्राला जबर धक्का बसला. लहान-लहान हॉटेल व्यवसाय, होम-स्टे, टुरिस्ट टॅक्सी चालक आणि स्थानिक मार्गदर्शक या सगळ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडली असल्याचे ते म्हणाले. मात्र आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून अशा प्रकारचे मोठे दहशतवादी हल्ले पुन्हा होतील, अशी शक्यता नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पर्यटकांनी पुन्हा एकदा या प्रदेशाला भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

पराभव झाला की अचानक मशीन दोषी ठरते

देशातील निवडणूक प्रक्रियेवर वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या शंकांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे कोणताही ठोस पुरावा नसताना ते केवळ पराभवानंतर शंका घेतात, असा त्यांचा आरोप आहे. ‘जेव्हा विजय मिळतो तेव्हा हाच ईव्हीएम योग्य वाटतो आणि पराभव झाला की अचानक मशीन दोषी ठरते,’ अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षे लोकांमध्ये न जाता केवळ निवडणूक जाहीर झाली की राज्यात उडी मारण्याची सवय विरोधकांमध्ये वाढत चालली आहे, असे ते म्हणाले. वर्षभर ‘व्होट चोरी’चे आरोप करणारेच पराभूत झाले, असे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये भाजपचा विजय जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच ‘आता तयारी पश्चिम बंगालची’ असे म्हटल्याचे आझादांनी स्मरण करून दिले. गुलाम नबी आझाद यांनी राजकीय संन्यास घेतला असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 22-11-2025