चिपळूण : वाशिष्ठी नदी संवर्धनाची योजना कागदावरच

चिपळूण : शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या संवर्धनाची योजना कागदावरच आहे. पाण्यात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काहीही ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची स्थिती आहे. नदीत थेट मिसळणारा कचरा व वाशिष्ठी नदीवरील चार पुलांवरून नदीपात्रात थेट टाकला जाणारा कचरा पालिकेची डोकेदुखी ठरत आहे.

वाशिष्ठी नदीच्या पाण्यामुळे शहरात पूर येतो. नदीतील गाळ त्याला कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गाळाचा मुद्दा दरवषीं चर्चेत राहतो; मात्र नदीचे प्रदूषण या विषयाकडे कोणीही लक्ष देत नाही. नदीला साडी नेसवणे किंवा जलपूजन करण्यासारखे उपक्रम राबवले जातात; मात्र नदीत कचरा येऊ नये यासाठी आवश्यक असलेली जनजागृती कोणीही करत नाही. खेर्डी एमआयडीसीतील कारखान्यांचा मैला, दूषित पाणी वाशिष्ठी नदीत सोडले जाते.

चिपळूण शहर आणि उपनगरातील चिकन’ विक्रेते, मटण विक्रेते त्यांच्या दुकानातील कचरा नागरिकांची नजर चुकवून सायंकाळी वाशिष्ठी नदीत टाकतात. अनेक विक्रेते शहराच्या बाहेर जाऊन पुलावरून नदीत घाण टाकतात, वाशिष्ठी नदीलगतच्या भागातील अनेक घरातील मैला थेट वाशिष्ठी नदीत सोडण्यात आला आहे. पालिकेच्या मालकीचे शौचालयही नदीच्या काठावर बाधलेले आहे. शहरातील अनेक नागरिक घरातील जुने साहित्य नदीत फेकून देतात. ते कुजल्यानंतर नदीतील पाणी दूषित होते.

मध्यंतरी शहरात एक गाढव मेले. त्यालाही वाशिष्ठी नदीत टाकण्यात आले. शहरातील अनेक गृहनिर्माण वसाहतीचे सांडपाणी गटारात सोडले जाते ते शिवनदीमार्गे वाशिष्ठी नदीला जाऊन मिळते. सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याचा रंगही काळा होतो. ग्रामीण भागात नदीकाठी वसलेल्या गावांचे सांडपाणीही थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी संवर्धनाचा विषय कागदावर असल्याचे दिसते.

वाशिष्ठी नदीच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. नुकतेच नदी की पाठशाला हा उपक्रम घेण्यात आला. हा उपक्रम कोणत्या एका माणसाने धरून चालणार नाही. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. सांडपाणी नदीत न सोडता ते खड़े मारून जमिनीत जिरवले पाहिजे. शहानवाज शहा, जतदूत चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 25/Oct/2024