गुहागर नगर पंचायतीत भाजपच्या वैशाली मावळंकर बिनविरोध

गुहागर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुहागर नगरपंचायतीमधील वॉर्ड क्र. ५ मधील मनसेच्या उमेदवार सिद्धी राजेश शेटे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका वैशाली मावळंकर यांची निवडणूकच बिनविरोध झाली आहे.

आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील सेना मनसे युतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. गुहागर नगरपंचायतीमधील वॉर्ड क्र. ४ आणि ५ मधील जागा मनसेसाठी सोडल्या. या निर्णयाचे स्वागत झाले.

गुहागरात मनसे पक्ष उभा करणारे कै. राजेश शेटे यांना मनसेने वॉर्ड क्र. ५ मधून उमेदवारी दिली तर कोमल दर्शन जांगळी यांना वॉर्ड क्र. ४ मधून उमेदवारी दिली. वॉर्ड क्र. ५ मध्ये केवळ भाजपच्या वैशाली मावळंकर आणि मनसेच्या सिद्धी शेटे यांच्यातच लढत होती. या वॉर्डात भाजपची ताकद आहे, हे लक्षात घेऊन सिद्धी शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे वॉर्ड क्र. ५ मधून वैशाली संतोष मावळंकर बिनविरोध निवडून आल्या आहेत.

सिद्धी शेटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल भाजपच्या उमेदवारी वैशाली मावळकर, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या वेळी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, निवडणूक प्रमुख नीलेश सुर्वे, किरण खरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे आदी उपस्थित होते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:19 PM 22-Nov-2025