लांजा-राजापुर मतदारसंघात इच्छुकांचे मनोरे कोसळले

लांजा : लांजा-राजापुरात जे उमेदवार आधीपासूनच मतदारसंघात विकासकामांच्या मुद्यावर राजकीय धुरळा उडवत होते, विकासकामांच्या माध्यमातून आपले वर्चस्व राखत होते त्यांनाच उमेदवारीपासून बाजूला करण्यात आल्याने इच्छुकांचे मनोरे कोसळले आहेत. असे असले तरी युती आणि आघाडीच्या सर्वच इच्छुकांना सहकार्याची साथ-सोबत निभवावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून उमेदवारीसाठी तयारी करणारे व स्वतंत्र लढण्याची गर्जना करणाऱ्यांना युती आणि आघाडीच्या बंधनात राहावे लागणार आहे हे नक्की.

लांजा-राजापूर मतदारसंघ हा पुन्हा शिवसेनेच्या वाट्यालाच आला असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह दिसून आला आहे. या मतदारसंघात शिवसेना या नावालाच उमेदवारी असून, शिवसेनेचेच दोन गटांचे उमेदवार परस्पर भिडणार असल्याचे निश्चित झाले आहे. उबाठा शिवसेनेचे राजन साळवी आणि शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले; मात्र इच्छुकांची तळमळ अस्वस्थ होऊ लागली आहे. इच्छुकांमधून बंडखोरी उभी राहते की काय, अशी परिस्थिती दिसून येते आहे. भाजपला उमेदवारी मिळावी यासाठी सुरुवातीपासूनच उल्का विश्वासराव यांनी सातत्याने मागणी केली होती. विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी लांजा- राजापूर मतदारसंघामध्ये मोठी राजकीय यंत्रणा राबवली. मात्र भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून शिवसेनेला (शिंदे गट) हा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. यामुळे भाजपच्या इच्छुकांची राजकीय ताकद युती बंधनात अडकली आहे. लांजा-राजापूर मतदारसंघात भाजपकडून उल्का विश्वासराव यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, महायुतीकडून किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विश्वासराव यांना माघार घ्यावी लागली आहे.

स्थानिक नेतृत्व म्हणून गेली पंधरा वर्षे विकासाचा मुद्दा घेऊन मतदारसंघात फिरत असलेले व महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांना पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल न मिळाल्याने त्यांनी अखेर मंगळवारी उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यशवंतराव यांच्यावर आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्यासाठी मोठी धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव यांची साथ आता साळवी यांच्यासाठी लक्षवेधी असणार आहे; मात्र यशवंतराव यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेत उडी मारल्याने लांजा- राजापूरमधील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम दिसून येतो आहे.

आघाडीमध्ये आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी २०१९ च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य घेतलेले आहे. यावेळी त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून त्यांनी प्रयत्न केले; मात्र आघाडीकडून लांजा-राजापूर-साखरपा पुन्हा सेनेला गेल्याने लाड नाराज झाले आहेत. मात्र, अविनाश लाड यांनी अपक्ष लढण्याचा पण केला आहे. त्याच उमेदीने लाड पुन्हा यावेळेस निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

मदत करणार की बंडखोरी करणार?
दरम्यान, लांजा-राजापुरात उमेदवारीचा दावा करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या तीन ही पक्षांच्या इच्छुकांचे मनसुबे युती व आघाडीच्या बदलाने कोसळले आहेत. कट्टर विरोधकांवर आता एकमेकांना मदत करण्याची वेळ आली आहे. एकमेकांचे राजकीय वैरी असणारे आता युती आणि आघाडीचा धर्म पाळणार की बंडखोरी करणार, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 25/Oct/2024