रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा ‘सुपर संडे’ काल महायुतीने चांगलाच गाजवला. राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरात पाच प्रचारसभा घेत वातावरण निर्मिती केली. विशेष म्हणजे या प्रचार दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्रमांक १ मधून झाली. यावेळी झालेल्या सभेत भाजपचे जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन यांनी तडाखेबाज भाषण करत महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. “प्रभाग १ मधील तिन्ही उमेदवार १ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
भाजप-शिवसेनेची अभूतपूर्व एकी
कालच्या सभेत महायुतीचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. प्रभाग १ च्या सभेत प्रचंड गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय असल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षांच्या एकीचा मोठा फायदा निवडणुकीत होईल, असे संकेत या सभेतून मिळाले.
“नितीन जाधवांना दिलेला शब्द पाळला”
सभेत बोलताना दीपक पटवर्धन यांनी पाच वर्षांपूर्वीच्या एका आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, “प्रभाग क्रमांक एक आणि आपले पालकमंत्री नंबर एक, हा एक चांगला सुयोग आहे. पाच वर्षांपूर्वी याच व्यासपीठावर नितीन जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा मी त्यांना शब्द दिला होता की, त्यांना नगरपालिकेची उमेदवारी नक्की मिळेल. आज तुमच्या साक्षिने तो शब्द पूर्ण होत आहे. युतीच्या माध्यमातून नितीन जाधवांना उमेदवारी मिळाली आहे.” यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, उमेदवार वैभवी खेडेकर आणि नितीन जाधव हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मताधिक्याचे गणित: ७ वरून १००० कडे!
दीपक पटवर्धन यांनी जुन्या निवडणुकीच्या आकडेवारीचा दाखला देत महायुतीच्या ताकदीचा अंदाज वर्तवला. ते म्हणाले, “पाच-सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी ‘बंड्या शेठ’ यांच्या विरोधात उभा होतो, तेव्हा युती नव्हती आणि मला फक्त ७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, जेव्हा साहेब (उदय सामंत) उभे राहिले, तेव्हा युती होती आणि या प्रभागाने ४०० चे मताधिक्य दिले. आता आपण सर्व एकत्र आहोत. त्यामुळे प्रभाग १ मधील तिन्ही उमेदवार आता १००० पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, हा मला विश्वास आहे.”
४०० कोटींचा विकास आणि भौगोलिक आव्हाने
रत्नागिरी शहरासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ४०० कोटींची कामे प्रस्तावित असून, त्यातील काही प्रकल्प प्रभाग १ मध्येही होणार आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले. प्रभाग १ च्या भौगोलिक परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, “हा भाग काहीसा दऱ्याखोऱ्यात वसलेला असून येथे नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. मात्र, उदय सामंत यांच्यासारखे सक्षम पालकमंत्री पाठीशी असल्याने येथील सर्व समस्यांचे नक्कीच निराकरण होईल.” यावेळी मतदारांना तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. ‘जय हिंद जय महाराष्ट्र’च्या घोषणेने सभेची सांगता झाली.














