रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे या दोन अपक्ष उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र.१० मधील अपक्ष उमेदवार संपदा रसाळ राणा आणि सचिन सदानंद शिंदे यांचे उमेदवारी अर्ज किंवा नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या रचनेत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचेही अर्ज अवैध ठरवले. उमेदवारी अर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नसल्याने दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद ठरवले गेले. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली, त्यावेळी या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दोन्ही अपक्ष उमेदवारांनी महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १५ नुसार न्यायालयात अपिल दाखल केले आहे. या अपिलात त्या प्रभागातील उमेदवार श्वेता कोरगावकर, मानसी करमरकर, राजेश तोडणकर आणि राजाराम रहाटे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
आज होणार सुनावणी : या याचिकेबाबत सोमवारी न्यायालयाची नोटीस जारी होवून तातडीने सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आपले उमेदवारी अर्ज वैध ठरवून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची संधी देण्याची विनंती अपिल करणाऱ्या अपक्ष उमेदवारांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 24/Nov/2025









