मंडणगड : मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने राज्यभर दौरे असतात, तरी आपल्या मतदारसंघाकडे पर्यायाने येथील प्रत्येक नागरिकांकडे काळजीपूर्वक कायम लक्ष असते. घार घिरटे घालती आकाशी लक्ष पिल्लांपाशी या उक्तीप्रमाणे माझी मतदारसंघाप्रती काळजी असते.
त्यामुळे आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यातील अनेक वर्षांचा विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याबरोबरच येथील रोजगाराचा प्रश्न उद्योग प्रकल्पांच्या निर्मितीतून सोडवणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांनी केली. तालुक्यातील पंदेरी धरणाच्या मजबुतीकरण, सांडवा दुरुस्ती व मुख्य विमोचकाचे बांधकाम या ६० कोटी विनियोगाच्या कामाचे भूमिपूजन २२ नोव्हेंबर २०२५ रोजी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात ना. कदम बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, दापोली मतदारसंघास पन्नास वर्षानंतर आपल्या माध्यामतून मंत्री पद मिळाले आहे, त्यामुळे आता येथील भौतिक व सर्वांगीण विकास साधण्यास आपण कटीबद्ध आहोत. मंडणगड तालुक्याच्या रोजगाराच्या प्रश्नाबाबत आपण आग्रही असल्याचे सांगत, नियोजित मोठ्या एमआयडीसीच्या माध्यामातून उद्योग प्रकल्प, कारखाने यांच्या निर्मितीतून नजीकच्या काळात तालुक्यात रोजगार उपलब्ध होतील असे ते म्हणाले. २०२१ सालच्या पंदेरी धरणाच्या गळतीच्या घटनेनंतर त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी मजबुतीकरणाच्या धरणाच्या कामाकरिता आवश्यक निधी शासनाच्या माध्यामतून मंजूर करून आणला आहे.
याशिवाय पाईप कालव्यांचे कामही मंजूर केले असल्याने आगामी काळात येथील धरणाच्या सिंचनाखालील गावांतील शेकडो एकरमध्ये दुबार शेतीसाठी अनुकुलता असले त्यामुळे येथील भागात शेतीतून सुबत्ता निर्माण होईल असे आश्वासक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 24/Nov/2025









