Bal Mane | मशाल चिन्हाला अधिक संधी असल्याने उबाठाचे उमेदवार निवडणूक रिंगणात : बाळ माने

रत्नागिरी : महाविकास आघाडी करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काही जागा सोडण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र काही ठिकाणी मशाल चिन्हावरच निवडणुकीला सामोरे गेल्यास यश मिळू शकते, हे कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळेच त्याठिकाणी उबाठाचे उमेदवार उभे आहेत. काँग्रेसचे नेते रमेश कीर यांनी केलेल्या जागावाटपाबाबतच्या आरोपावर आपण त्यांची माफी मागतो, असे शिवसेना उबाठाचे उपनेते बाळ माने यांनी सांगितले. आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून योग्य ते निर्णय ते घेतील, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे माजी खा. विनायक राऊत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, उबाठा शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी सावंत माने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उबाठासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस, बसपाचे उमेदवारही उपस्थित होते. प्रभाग १२ अ मध्ये माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचे बंधू देवेंद्र मयेकर यांच्या पत्नी मैथिली मयेकर यांना महाविकास आघाडीतर्फे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने उबाठाने त्या प्रभागातून अर्ज मागे घेतल्याचे माजी आ. बाळ माने यांनी सांगितले.

काँग्रेसला काही जागा सोडण्याबाबत रमेश कीर यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र उबाठाचे मशाल चिन्ह हे लोकसभा आणि विधानसभेला घराघरांत पोहचल्याने, राजिवडा व मिरकरवाडा या ठिकाणी हातऐवजी मशाल चिन्हाला अधिक लाभ होईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यामुळेच तेथील अर्ज मागे घेतले नाहीत. यात काँग्रेस नेते रमेश कीर यांनी मांडलेली भूमिका चुकीची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण रमेश कीर आणि राष्ट्रवादीचे मिलींद कीर यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुका जाहीर झाल्यापासून काही ठिकाणी समाजाच्या बैठका आयोजित केल्या जात आहेत. ही एक प्रकारे समाजात फूट फाडण्याचा प्रकार असून हे अत्यंत वाईट कल्चर असल्याचेही माजी आ. बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 24/Nov/2025