देवरुख : सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरणप्रकरणात तपासाची मोठी कळी उघड झाली आहे. आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार अपहरणासाठी वापरलेले पिस्तूल मुचकुंदी नदीत फेकण्यात आले होते. शनिवारी दुपारी पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवून पिस्तूल हस्तगत केले.
केतकर यांचे १७ सप्टेंबर रोजी वांझोळे येथे अपहरण केले होते. रोख रक्कम आणि दागिने काढून घेतल्यानंतर त्यांना कारमध्ये डोक्यावर आवरण घालून बसवण्यात आले व रात्री उशिरा वाटुळ परिसरात सोडण्यात आले. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि देवाखातील निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली तपासाचा वेग वाढला. या प्रकरणात सागर कदमसह आठ आरोपींना अटक झाली आहे. सागर कदमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. चौकशीत त्याने पिस्तूल मुचकुंदी नदीत टाकल्याची माहिती दिली. या संकेताधारे पोलिस पथक शनिवारी मुचकुंदी नदीवर दाखल झाले. पाण्यात शोध घेणे कठीण असले तरी देवरुखातील देवानंद आणि संजय गजबार यांनी नदीत उतरून तब्बल दोन तास शोधमोहीम चालवली आणि अखेर गाळात गेलेले पिस्तूल सापडले.
सागर कदमने, दुधाणे आणि राजेश नवाले यांच्या मदतीने हे पिस्तूल नांदेड येथून विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या व्यवहारामागील इतर धागेदोरे तपासले जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 24/Nov/2025














