देवरूख : देवरूख शहराची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचा वार्षिक देव दिवाळी उत्सव व लोटांगण यात्रा शुक्रवारी उत्साहात पार पडली. लोटांगणामध्ये ११ भक्तगणांनी लोटांगण घालून नवस फेडले. सकाळी देवीची विधिवत पूजा, विडा ठेवणे हा कार्यक्रम देवीचे कुमकर व मानकरी यांच्याकडून करण्यात आली. दुपारी देवीला बोललेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी लोटांगण यात्रेत भक्तगण सहभागी झाले होते.
तासे वाजंत्री व भजन आळवत देवीची आरती घेऊन प्रत्यक्ष लोटांगण यात्रेचा प्रारंभ ४ वा. करण्यात आला. यावेळी नवस बोललेले ११ भक्तगण या लोटांगण यात्रेत सहभागी झाले. देवीच्या मंदिरासमोरून ही लोटांगण यात्रा पार पडली. लोटांगणाला सुरुवात होताच मंदिर परिसरामध्ये मोठी यात्रा भरली. यावेळी ४४ खेड्यांमधील भक्तगण या यात्रेत सहभागी झाले. यात्रेमध्ये शेकडो खाऊ व खेळण्याची दुकाने थाटण्यात आली होती. आकाश झुलादेखील या यात्रेत उभारण्यात आला होता. याचा मनमुराद आनंद भक्तांनी घेतला.
सायंकाळी प्रत्यक्ष देवीसमोर नवस फेडून व परिसरातून आलेल्या नैवेद्यांचा प्रसाद करून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेत हजारो भक्तांनी सहभागी होऊन यात्रा सफल केली. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 24/Nov/2025














