चिपळूण : खेर्डी MIDC परिसरातील थ्री एम पेपर मिल कंपनीला आज अचानक भीषण आग लागून परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी अचानक उठलेल्या धुराच्या लोटांनंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्याने ज्वाळांनी क्षणार्धातच वेग घेतला आणि आगीचे प्रमाण झपाट्याने वाढले.
आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समजत नाही. परिसरात प्रचंड धूर पसरल्याने स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अर्ध्या तासांहून अधिक वेळ ज्वाळा भडकलेल्या स्थितीत असून आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारणी आणि इतर उपकरणांच्या साहाय्याने प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार विद्युत बिघाड किंवा मशीनरी ओव्हरहिट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसर बंदोबस्तासाठी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 24/Nov/2025









