“रत्नागिरीला पहिला मुस्लिम नगराध्यक्ष का नको? मतांसाठी वापर आणि पदासाठी विरोध, हे चालणार नाही!” – बंटी वणजु

◼️ ‘आम्ही कोणालाही मॅनेज नाही, लढणार आणि जिंकणार!’

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Ajit Pawar Faction) स्थानिक पातळीवर ‘स्वबळाचा’ नारा दिला आहे. “महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी जागावाटपात आमच्या तोंडाला पाने पुसली,” असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बंटी वणजू यांनी आज पत्रकार परिषदेत मित्रपक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार बशीर मुर्तुझा, राजन सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीतून बाहेर का पडलो?
बंटी वणजू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “मुंबईत झालेल्या बैठकांमध्ये सुनील तटकरे, अजित दादा यांनी वारंवार सांगितले होते की, रत्नागिरीत राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाव्यात. मात्र, राजापूर वगळता जिल्ह्यात कुठेही आम्हाला स्थान दिले नाही. स्थानिक नेत्यांनी शून्य प्रयत्न केले. आम्ही खासदारकी आणि आमदारकीला महायुतीचा प्रामाणिक प्रचार केला, पण आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केल्याने आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.”

“रस्ते नुसते होतायत आणि वितळतायत”
शहरातील सध्याच्या विकासकामांवर ताशेरे ओढताना वणजू म्हणाले, “रत्नागिरीचा खरा विकास हा सुनील तटकरे साहेबांच्या काळातच झाला. गेल्या २० वर्षांत फक्त रस्ते बनवले जात आहेत, पण ते टिकत नाहीत. रस्ते अक्षरशः वितळत आहेत. मटेरियलचा दर्जा काय आहे, हे कोणालाच माहित नाही. पर्यटनाच्या गप्पा मारल्या जातात, पण समुद्रकिनाऱ्यावर साधे मोबाईल टॉयलेट्स नाहीत. गार्डन बांधलेत, पण तिथे जायला रस्ते नाहीत.”

‘मॅनेज’ असल्याच्या अफवांना पूर्णविराम
राष्ट्रवादीचे उमेदवार हे कोणाला तरी मदत करण्यासाठी किंवा मते खाण्यासाठी उभे आहेत, या अफवांचे खंडन करताना वणजू म्हणाले, “आम्ही कोणालाही ‘मॅनेज’ झालेलो नाही. आम्ही अस्मिता चवंडे, ॲड. राकेश आंब्रे, सृष्टी आडवकर यांसारखे सुशिक्षित आणि सर्वसामान्य घरातील उमेदवार दिले आहेत. नगरपालिकेत वर्षानुवर्षे तेच चेहरे आहेत, जे फक्त निवडणुकीपुरते ‘नमस्कार’ करायला येतात. आम्हाला हा पायंडा बदलायचा आहे.”

हिंदू-मुस्लिम एकोप्याचा मुद्दा आणि मुर्तुझा यांची उमेदवारी
राष्ट्रवादीने वहिदा मुर्तुझा यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले आहे. यावर बोलताना वणजू म्हणाले, “आम्ही पहिला मुस्लिम नगराध्यक्ष उमेदवार दिला आहे. पण आता काही लोक हिंदू-मुस्लिम असा भेद करत आहेत. रत्नागिरीत सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. केवळ मतांसाठी मुस्लिम समाजाचा वापर करायचा आणि त्यांना पद द्यायची वेळ आली की विरोध करायचा, हे चालणार नाही. मुस्लिम समाजानेही विचार करावा की त्यांना नक्की कोणी साथ दिली आहे.”

शाळा आणि शिक्षणाची दुर्दशा
शहरातील शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवताना राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहेत. “जिथे लोकमान्य टिळक शिकले, त्या शाळेच्या ग्राउंडमध्ये बांधकाम करून मुलांचे खेळण्याचे मैदान हिरावून घेतले आहे. भविष्यात तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा घाट घातला जातोय. इतर शहरांत नगरपालिकांच्या शाळा ‘सीबीएसई’ (CBSE) होत आहेत, आणि आपल्याकडे शाळा बंद पडत आहेत. गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आमचा लढा आहे,” असे वणजू यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या या आक्रमक भूमिकेमुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या तिरंगी लढतीत कोणाचे पारडे जड ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 25-11-2025