Khed : आंबये येथे ४ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव

खेड : तालुक्यातील श्री दत्तगुरू देवस्थान, दत्तवाडी आंबये ग्रामस्थ तसेच पुणे, ठाणे, मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा श्री दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती असून, यानिमित्त मंदिर परिसरात विविध उपक्रम आयोजित केले आहेत. ४ ला सायंकाळी दीपप्रज्वलनानंतर पूजा, अभिषेक व होमहवन कार्यक्रम होणार आहेत. याच दिवशी गावातील व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सत्संग व संस्कार वर्गाचे आयोजन केले आहे. रात्री हरिपाठ, भजन व महाप्रसाद आहे. ५ ला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी सकाळी काकडआरती व दीपपूजनाने कार्यक्रमांचा प्रारंभ होईल.

दुपारी भक्तजनांसाठी महाप्रसाद आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, दत्तगुरूंची पालखी प्रदक्षिणा आणि भक्ती गीते मंडळाच्यावतीने सादर करण्यात येणार आहेत. भक्तांनी उपस्थित राहून दत्तजयंतीचा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन संस्थेचे प्रणित सकपाळ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 26/Nov/2025