संगमेश्वर : तालुक्यातील कुरधुंडा बौद्धवाडीत बिबट्याच्या सततच्या वावरामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. येथील शेतकरी ऋषभ जाधव यांनी चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्यांची शिकार करण्यासाठी बिबट्याने एका बकरीवर हल्ला केला. या वेळी ऋषभ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तावडीतून बकरीला सोडवले. ती जखमी झाली. याचवेळी बिबट्याने दुसऱ्या बकरीवर झडप मारून ऋषभच्या डोळ्यादेखत बकरीला पळवले. दोन दिवस रात्रीच्यावेळी गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे ऋषभवर मोठे संकट ओढवले आहे.
ऋषभ हे सर्वसामान्य शेतकरी असून, शेळ्यापालन करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो; मात्र गेले वर्षभर या भागात बिबट्याचे वास्तव्य वाढले असल्याने ऋषभने मोठ्या मेहनतीने पाळलेल्या शेळ्या कधी रानात चरत असताना, तर कधी गोठ्यात शिरकाव करून फस्त करत आहे. गेल्या वर्षभरात दहा शेळ्या व चार पिल्लांची शिकार बिबट्याने केली असून, बिबट्याच्या तावडीतून जखमी अवस्थेत सहा ते सात शेळ्या सुटल्या. त्यातील दोन शेळ्या उपचार करूनही वाचवता आल्या नाहीत. गेले वर्षभर वावर असलेल्या बिबट्याचे परिसरात अनेकांना दर्शनसुद्धा झाले आहे. मोठ्या मेहनतीने पाळलेल्या बकऱ्यांवर बिबट्या ताव मारत असल्याने व पाठ सोडत नसल्याने या गरीब शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.
मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची दहशत वाढली असून, दिवसाढवळ्याही बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ सैरवैर भटकंती करताना दिसू लागल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची तसदी घ्यावी, अशी ग्रामस्थांची मांगणी आहे.
बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून गेले वर्षभर वनविभाग कर्मचाऱ्यांना माहिती देऊन तसेच वर्षभरात ज्या ज्या वेळी बकऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या त्या त्या वेळी त्यांना माहिती देऊन सुद्धा या गंभीर विषयाची कोणतीच दखल घेतली नाही. चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचीसुद्धा माहिती देण्यात आली; परंतु साधी विचारपूस करण्यासाठीसुद्धा वनविभाग कर्मचारी आले नाहीत. –ऋषभ जाधव, शेतकरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 26/Nov/2025














