Chiplun Flyover | चिपळुणातील उड्डाणपूल उभारताना सुरक्षेकडे दुर्लक्ष

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येथे लहान-मोठे अनेक अपघात झाले असताना कामगार आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पुलाखालून प्रवास करणारे प्रवासी आणि पुलावर काम करणारे कामगार दोघेही असुरक्षित आहेत.

बहादूरशेख नाक्यापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत उहाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी बहादूरशेख नाका येथे गर्डर कोसळले. त्यानंतर पुलाचे नवीन डिझाईन करून ४० मीटरऐवजी २० मीटरवर नवीन पीलर टाकण्याचे ठरले. पूर्वी उभारलेल्या पिलरच्या वरचा भाग तोडत असताना कामगार पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर लोखंडी रॉड पडून पादचारी जखमी झाला होता, ठेकेदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या कायद्यांना पायदळी तुडवत असल्याचे दिसते.

उडाणपुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कधी लोखंडी सळी कोसळते, कधी पत्रा कोसळतो, तर कधी अन्य साहित्य वरून खाली पडते. सुदैवाने, त्यात गंभीर जखमी होण्याचे प्रकार अलीकडे झालेले नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहतूक सुरू असते. त्यामुळे सेवारस्त्यावर अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, सेफ्टी शू नाहीत

उड्डाणपुलाच्या कामावर सुमारे साठ कामगार कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, हातमोजे, सेफ्टी शू देणे गरजेचे आहे. त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. पुलाच्या खांबाचे काम करत असताना कामगार असुरक्षितपणे पळीवर किंवा लोखंडी गजावर उभे राहून आपला जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात. सुरक्षिततेसाठी जाळ्या मोजक्या ठिकाणी बांधलेल्या आहेत.

महाविद्यालयाचे विद्यार्थी जातात
डीबीजे महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच या भागातील प्रवासी येथून पायी चालत ये-जा करत असतात. अनेकवेळा रस्त्याच्या बाजूला रिक्षा उभ्या केल्या जातात. महामार्गाच्या दोन्ही बाजूने काही हॉटेल आणि पेट्रोल पंप आहेत. येथे येणाऱ्या वाहनचालकांना तसेच पर्यटकाची सुरक्षाही धोक्यात आहे.

उड्डाणपुलाच्या ठिकाणी काम करणारे कामगार खासगी एजन्सीचे आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचना आम्ही एजन्सीला दिल्या आहेत. त्यांचा विमा उतरवण्याची सूचनाही केली आहे. उड्डाणपुलाचे काम करताना कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहेत. रात्री वाहतूक कमी असल्याने रात्री कामाला प्राधान्य देतो- नजीब मुल्लाम, सहायक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 26/Nov/2025