दापोली : ग्रामीण कृषि मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिनांक २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान कमाल तापमान ३४ ते ३५ अंश से. या दरम्यान आणि किमान तापमान २१ ते २३ अंश से. या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांमध्ये सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७-६८%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५०-६५% या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
दिनांक २६ ते ३० नोव्हेंबर रोजी वाऱ्याचा वेग ७.०-८.० किमी/तास आणि मेघ अच्छादन मुख्यत्वे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक २९ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, तर दक्षिण कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्या कमी तापमानामुळे जनावरे व कोंबड्यांच्या निवाऱ्यात उबदार वातावरण राखण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी.
पीकनिहाय सल्लाः सामान्य सल्ल्यानुसार, भात पिकाची कापणी झाल्यानंतर शेतात वाफसा असल्यास लगेच नांगरट करावी. रब्बी पिकांची पूर्वमशागत, पेरणी तसेच रोपवाटिकेची तयारी ही सर्व कामे जमिनीत वाफसा स्थिती असताना करावीत. पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया करून बियाण्यातून व मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करावे.
वालः वाल पिकाची विनामशागत पेरणी करण्यासाठी, खरीप भात काढणीनंतर तणांचे ग्लायफोसेट वापरून नियंत्रण करून, टोकण पद्धतीने ३० x १५ सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. मशागत करून पेरणी करताना प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे आणि पेरणी टोकण पद्धतीने ३० सें.मी. x १५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन बुरशीनाशक व त्यानंतर रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
आंबा आणि काजू: आंबा आणि काजू बागांमध्ये नवीन पालवी येत असल्यामुळे कीड प्रादुर्भावासाठी बागांची नियमितपणे पाहणी करावी. आंब्याच्या झाडांवर नियमित मोहोर येण्यासाठी बेसिन एक्सपोजर ही प्रक्रिया सुरू करावी. यासाठी झाडाच्या बुंध्यालगतची जमीन झाडाच्या बुंध्यापासून सुमारे १.५० मीटर अंतरापर्यंत आणि १५-२० सें.मी. खोलीपर्यंत उकरावी. नवीन पालवीवर तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रिन २.८% EC @ ९ मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
नारळः नारळावर रुगीज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे, तिच्या बंदोबस्तासाठी नियमित पिकावर पाण्याची फवारणी करत राहावी किंवा ईमिडॉक्लोप्रिड १७.८ एस. एल. ०.०५ टक्के फवारणी करावी.
मधुमका, मोहरी, भुईमुग, कुळीथ, चवळीः या रब्बी पिकांची लागवड वाफसा स्थितीत पूर्वमशागत करून आणि शिफारशीनुसार खतमात्रा देऊन करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक व शिफारस केलेल्या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
कोबी/नवलकोल: कोबी आणि नवलकोल पिकाच्या लागवडीसाठी गादीवाफे तयार करून रोपवाटिका तयार करावी.
वांगी/मिरची/टोमॅटोः रब्बी हंगामासाठी रोपे तयार करण्याकरिता गादीवाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी बियाण्यास मेटॅलेक्सिल किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. मिरची, वांगी आणि टोमॅटोची ४ ते ६ आठवड्यांची रोपे सरी-वरंबा पद्धतीने शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. लागवडीपूर्वी रोपांच्या मुळांना ट्रायकोडर्मा/स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट द्रावणात बुडवून ठेवावे.
पशुपालन आणि कुकुटपालनः सध्या शेळ्या विण्याचा हंगाम सुरू असल्यामुळे करडे ठेवलेल्या ठिकाणी उबदार वातावरण राखावे. कुकुटपालनामध्ये थंडीपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेस उष्णतेसाठी विजेचे बल्ब लावावेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 26/Nov/2025














