Khed: शिवशाही बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, १० जखमी

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कळमजे पुलाजवळ शिवशाही बस आणि सीएनजी ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, शिवशाही बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य दहा जण जखमी झाले आहेत.

​अपघातानंतर तातडीने जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, श्याम सुंदर गावडे (वय ८५, रा. विक्रोळी, मुंबई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबईहून मालवणकडे निघालेली शिवशाही बस (MH 09 EM 9074) आणि सीएनजी ट्रक (MH 43 CK 3421) यांची कळमजे पुलाजवळ जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक सीएनजीवर असल्याने मोठी आग लागण्याची दुर्घटना टळली, असे पोलिसांनी सांगितले.

अपघातात एकूण दहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अंकुश चंद्रकांत मेस्त्री (५४), शशिकांत शंकर तावडे (७२), प्रशांत शशिकांत राजशिर्के (४०), सुप्रिया सुधाकर मोरे (५५), प्रतिभा प्रकाश नागवेकर (५९), आर्या अमित मयेकर (३८), गायत्री अमित मयेकर (१३), अक्षता अनंत पोळवणकर (४०), दीपाली तुकाराम मोकळ (३०) आणि आयशा अमित मयेकर (६).

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

​या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 27-11-2025