Ratnagiri : जिल्ह्यात पंपावर बाटली, कॅनमधून पेट्रोल देण्यास बंदी; दहशतवादविरोधी पथकाचे फर्मान

रत्नागिरी : दिल्लीतील लाल किल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने पंपावर बाटली किंवा कॅनमधून पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे. तसे आदेश सर्व पेट्रोलपंप चालकांना देण्यात आले असून, नोटीसही चिकटवली आहे; परंतु यामुळे जिल्ह्यातील ग्रासकटर व इतर अवजारे चालवणाऱ्या शेतकऱ्यांची, मच्छीमार किंवा व्यावसायिकांची अडचण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला विचारणा केली असता त्यांना हे आदेश पोलिस दलाकडून दिल्याचे सांगण्यात आले.

दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादीविरोधी पथकाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर बाटली किंवा कॅनमधून पेट्रोल देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश सर्व पेट्रोल पंपचालकांना देण्यात आले असून, तशा आशयाची नोटीस पंपांवर ठळकपणे लावली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ला झाला. सुट्या पेट्रोलचा गैरवापर हो ण्याच्या शक्यतेने खबरदारी म्हणून दहशतवादीविरोधी पथकाने ही कार्यवाही केली आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालक, मालक यांनी पेट्रोलपंपावरती पेट्रोल कॅन, बाटलीमध्ये कोणालाही विक्री करू नये, तशा सक्त सूचना आपल्या पेट्रोलच्या आस्थापनावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात, अशा प्रकारचे आदेश काढले आहेत. रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक समीर मोरे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य घातपात टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे निर्बंध लादण्यात आले आहेत. शेतीसाठी किंवा बागांमध्ये गवत कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रासकटरसारख्या छोट्या यंत्रांसाठी पेट्रोलची आवश्यकता असते. ही यंत्रे थेट पंपापर्यंत आणणे शक्य नसल्याने शेतकरी बाटली किंवा कॅनमधून पेट्रोल नेत असत. यावर बंदी आल्याने त्यांचे काम खोळंबले आहे. इतर छोटी अवजारे आणि जनरेटर या व्यतिरिक्त रस्त्यावरील कामे करणारे व्यावसायिक तसेच वीज गेल्यावर वापरले जाणारे छोटे जनरेटर चालवणारे नागरिक यांनाही पेट्रोल मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशी सवलत देण्याची मागणी
या नियमांमुळे शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या दैनंदिन कामावर थेट परिणाम होत असल्याने या वर्गाला दिलासा देण्यासाठी पेट्रोल पंपावर आधार कार्ड, ओळखपत्र आणि मशिनरीचे कागदपत्र दाखवणाऱ्यांना मर्यादित प्रमाणात पेट्रोल देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

पेट्रोल पंपावर पॅकबंद मेटलच्या बाटलीतून एक लिटर पेट्रोल देता येऊ शकते; मात्र बाटली किंवा कॅनमधून पेट्रोल देण्यास बंदी आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून देशभरात सर्वत्र अशा प्रकारे पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे. त्याची आम्ही काटेकोर अंमलबजावणी करत आहोत. –अर्जन सिंग पेट्रोल पंपचालक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 27/Nov/2025