रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. राणे, शिंदे यांच्याशी जवळचे संबंध असतानाही मी गद्दारी केली नाही. शिवसेनेकडून तीन टर्म आमदार होतो. जनतेचे आशीर्वाद पाठीशी आहेत. राजापुरात जे प्रवेश दिसताहेत ते वरवरचे आहेत. आमची दुसरी फळी मजबूत आहे. राजापूरबरोबर रत्नागिरीतही माझे लक्ष राहणार असून, उदय सामंत यांचा या निवडणुकीत राजकीय अस्त करू, असा इशारा राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार राजन साळवी यांनी दिला.
येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे सेनेकडून मलाच पसंती आहे. यापूर्वी पहिल्यांदा पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर तीन निवडणुकीत विजयी झालो आहे. या विधानसभेत महाविकास आघाडीचे १८८ उमेदवार विजयी होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि मी मंत्री होईन.
अजित यशवंतराव पक्षात आल्यामुळे बळकटी मिळणार आहे. त्यांच्या पाठीशी युवावर्गाची मोठी ताकद आहे. शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्यापासून अनेक निवडणुका पदाधिकाऱ्यांसाठी लढलो आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते ठाकरेंच्या सोबत आहेत. माजी आमदार बाळ माने पक्षात आले असून पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे येथील पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील. पालकमंत्री म्हणून सामंतांनी सर्वांना सारखा न्याय दिलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी दुजाभाव केला.
नियोजनच्या निधीबाबत अन्याय केला आहे, तसेच रिफायनरीला ठाकरे गटाने विरोध केला होता. त्यानंतर नाणार रिफायनरी रद्द करण्यात आली. बारसू येथील जागेबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले होते. केंद्राने त्याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे आपण पाठिंबा दिला होता; परंतु स्थानिकांनी त्याला विरोध केल्यामुळे आपणही त्यांच्या पाठीशी आहोत, असे साळवी यांनी सांगितले.
काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा करणार
काँग्रेसने सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी असते. उमेदवारी अर्ज दाखल करणे व अर्ज मागे घेणे यामध्ये मुदत आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा, असे साळवी यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 25/Oct/2024














