Uday Samant | रत्नागिरी शहरातील भुयारी गटारासाठी २०० कोटी : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास सुरू झाला आहे. २०० कोटींच्या पहिल्या टप्प्याची कामे सुरू आहेत. उर्वरित २०० कोटी शहरातील भुयारी गटारासाठी ठेवलेले आहेत. अतिशय चांगल्या दर्जाची भुयारी गटारे बनवण्यात येणार आहेत. जनता विकासाच्या मागे राहते, याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी कोणत्याही कोल्हेकुईला घाबरलो नाही. जे आमच्या विरोधात अपप्रचार करत आहेत. भाजपमध्ये विष कालवून तिकडे गेले त्यांचे ३ तारखेला नक्कीच १२ वाजवणार, असा ठाम विश्वास महायुतीचे नेते आणि शिवेसनेचे उपनेते उदय सामंत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी शहरातील कॉर्नरसभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, बिपिन बंदरकर, संपर्क नेते जाधव, राजू महाडिक, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, नगरसेवकपदाचे उमेदवार राजू तोडणकर, मानसी करमरकर, विजय खेडेकर, सायली पाटील, श्रद्धा हळदणकर, गणेश भारती आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री सामंत म्हणाले, भाजप- शिवसेना युतीची संकल्पना बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी तिची अंमलबजावणी केली.

रत्नागिरीतील युती सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, ही युती जिल्ह्यामध्ये कायम राहावी यासाठी प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या साथीने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढवल्या जाणार आहेत. रत्नागिरीतील महायुतीचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात घ्यावा, अशी ही महायुती आहे. पुढील सहा महिन्यांत रत्नागिरीचे विमानतळ सुरू होईल, ज्यामुळे मुंबईला फक्त २ हजारांमध्ये विमानाने जाता येईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर (देशातील पहिली किल्ल्याची प्रतिकृती) तयार होत आहे. पूर्वी निवेदन घेऊन जावे लागायचे; पण आता एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याने विकासाला गती मिळाली.

विकासकामांमध्ये अनावश्यक विरोध
सेमीकंडक्टर कंपनी जर मुलगा-मुलगी घरी बसून ५ लाखांची नोकरी करणार असेल, तर विरोध का करायचा? दोन वर्षांनंतर रत्नागिरीत बनवलेली शस्त्रे सैन्याच्या हातात असतील. कारण, बंदुकांचा कारखाना वाटद इथे होत आहे; परंतु विरोधकांकडून बदनामी करण्याचा ‘धंदा’ सुरू आहे. विकासकामांमध्ये अनावश्यक टीका आणि विरोध होत आहे. विकासाची दिशा फक्त रस्त्यावर अवलंबून नसते, तर ती सर्वांगीण विकासावर अवलंबून असते. त्यामुळे सगळ्यांनी मिळून ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊन शहराच्या विकासाला गती दिली पाहिजे, असे आवाहन सामंत यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 27/Nov/2025