Uday Samant | रत्नागिरीत राज्यातील पहिला महिला बचतगट मॉल उभारणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात शिक्षण, स्वयंरोजगार, खड्डेमुक्त रस्ते होणार आहेत; परंतु याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील पहिला बचतगटाचा मॉल शहरातील आठवडा बाजार येथे उभारण्यात येत आहे. तसेच मे महिन्यापासून दोन हजार रुपयांत मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याचा मानस पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

शहारतील कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख यशवंत जाधव, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे, श्रद्धा हळदणकर, गणेश भारत, सौरभ मलुष्टे, पूजा पवार, विजय खेडेकर, सायली पाटील आदी उपस्थित होते.

महायुतीकडून रत्नागिरी शहरात शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यासाठी विविध ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित केल्या जात आहेत. रत्नागिरीतील ता. २६ रोजी झालेल्या सभेत ते म्हणाले, राज्याचे पहिले कौशल्य केंद्र पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आहे.

रत्नागिरीच्या विकासासाठी एका पैशाचीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुंबई महापालिकेत काम केलेल्या यशवंत जाधव यांनी दिली आहे. पुढील दोन महिन्यांत रत्नागिरी शहर खड्डेमुक्त होईल, तर वर्षभरात पाणी आणि विजेचा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल. महिला बचतगटांना न्याय देण्यासाठी आठवडा बाजारात महाराष्ट्रातील पहिला बचतगटाचा मॉल उभारण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 29/Nov/2025