Rajesh Aggarwal IAS : राजेश अगरवाल राज्याचे नवे मुख्य सचिव

मुंबई :राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अगरवाल (Rajesh Aggarwal IAS) यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena) हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अगरवाल हे मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) असतील. राजेश अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या आधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती.

या आधी 30 जून 2025 रोजी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची कारकीर्द आता 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्य सचिवपदाचा पदभार हा राजेश अगरवाल यांच्याकडे हस्तांतरित केला जाणार आहे.

राजेश अग्रवाल यांना प्रशासनात दीर्घ अनुभव असून त्यांचे काम तितकेच प्रभावी ठरले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये अग्रवाल यांनी केलेली कामगिरी त्यांना देशातील प्रगतिशील प्रशासकांपैकी एक बनवते.

Who Is Rajesh Aggarwal IAS : कोण आहेत राजेश अगरवाल?

राजेश अग्रवाल यांनी आयआयटी दिल्ली येथून बी.टेक (Computer Science) पदवी प्राप्त केली. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतरही त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर शासन व्यवस्थेत कसा प्रभावी ठरू शकतो, यावर सातत्याने काम केले.

Rajesh Agrawal IAS : राज्य प्रशासनातील भूमिका

महाराष्ट्र कॅडरमध्ये नियुक्तीनंतर अग्रवाल यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. अकोला आणि जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली. मुंबई महानगरपालिकेत डेप्युटी कमिशनर पदावर असताना शहरी व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रकल्प राबवले. महाराष्ट्राच्या वित्त विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागात त्यांनी धोरणात्मक निर्णय, आर्थिक शिस्त आणि डिजिटल प्रशासनाला बळ देण्यावर भर दिला.

Rajesh Aggarwal IAS Career : केंद्रातील कामाची दखल

केंद्रात कार्यरत असताना अग्रवाल यांच्या आधार, जनधन, डिजिलॉकर या कामाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. तसेच सामाजिक न्याय उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा मानला जातो.

राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीपूर्वी ते भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे (DEPwD) सचिव म्हणून कार्यरत होते. दिव्यांग नागरिकांसाठी धोरणे आणि सुविधा प्रभावीपणे राबवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे व्यापक कौतुक झाले.

डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता आणि कार्यक्षम गव्हर्नन्समध्ये त्यांचा अनुभव राज्याच्या विकासयात्रेला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अग्रवाल यांची तंत्रज्ञानाभिमुख विचारसरणी, जमिनीवरची कार्यशैली आणि केंद्र-राज्य पातळीवरील अनुभव यामुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 28-11-2025