संगमेश्वर : ग्रामपंचायत अखत्यारित असलेल्या बांधण्यात येणाऱ्या नवीन घरांसाठीची बांधकाम परवानगी पूर्वीप्रमाणेच मिळावी, अशी मागणी कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य सुनील दळवी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली. तसे निवेदन त्यांना देण्यात आले.
शासनाच्या काही नियमांचा ग्रामीण भागातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य माणूस अशा नियमांची पूर्तता करताना मेटाकुटीस येत आहे. गावात नवीन घर बांधताना काही परवानग्या घेण्यासाठी होणारा त्रास आणि जाणारा पैसा यामुळे नवीन घर बांधू नये, अशीच स्थिती आहे.
शासनाचे घरकुल बांधताना कोणतीही नवीन परवानगी लागत नाही; मात्र स्वखर्चाने घर बांधायचे म्हटले की, परवानग्या घ्याव्या लागतात. घर बांधले तरी ते अनधिकृत म्हणून पावती दिली जाते. हीच बाब कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी परिषदचे सदस्य सुनील दळवी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे.
यावर मंत्री योगेश कदम यांच्याबरोबर चर्चाही केली. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींतर्गत नवीन घरांना परवानगी मिळावी याबाबत अधिवेशनामध्ये मागणी करण्याची विनंती केली. नगरपालिका, महानगरपालिकांना असणारे नियम ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीला न लावता नवीन घर बांधताना ग्रामपंचायतींना पूर्वीसारखेच नियमांचे पालन करून परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी सुनील दळवी यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 29/Nov/2025









