मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच, नीलेश राणेंचा थेट आरोप

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, हे रवींद्र चव्हाण यांचे विधान म्हणजे मित्रपक्षाला थेट धमकी आहे असे मी समजतो. मालवणमध्ये जे काही उलटसुलट घडत आहे ते भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच घडत आहे, असा माझा थेट आरोप आहे.

ते आणि त्यांची माणसे यातून वाचणार नाहीत, अशा शब्दांत आमदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

मालवण येथे आमदार राणे यांनी शुक्रवारी (दि.२८) माध्यमांशी बोलताना म्हणाले, मला काहीतरी चुकीचे घडताना दिसले म्हणून मी आवाज उठविला. माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्यानिशी मी बोलत आहे. यानंतर माझ्यासोबत काय काय होणार आहे हेसुद्धा मला माहीत आहे. परंतु भिजलेला माणूस पावसाला घाबरत नाही. माझे हात स्वच्छ आहेत. मी तुमचे हात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.

भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या आरोपांचे खंडन करताना राणे म्हणाले, परवानगी मागून त्यांच्या घरात गेलो. त्यांचा आक्षेप असता तर दरवाजा उघडला तेव्हाच मला थांबवले पाहिजे होते. मला या म्हटले आणि वारंवार मला ते बसायला सांगत होते. क्राईम सीन होत असताना आरोपी पकडून देणे म्हणजे गुन्हा नाही. केलेल्या गुन्ह्याची माफी मागायची सोडून आरोप करताना लाज वाटली पाहिजे. त्यांना हा विषय डायव्हर्ट करायचा आहे. मी हा विषय डायव्हर्ट व्हायला देणार नाही.

चुकीच्या गोष्टी समजल्या त्या मी जनतेसमोर ठेवल्या

उदय सामंत येऊन गेले यात काही चुकीचे होते तर तेव्हा का तक्रार केली नाही. मला काही चुकीच्या गोष्टी समजल्या त्या मी जनतेसमोर ठेवल्या. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्हाला आम्ही काही चुकीचे करत आहोत असे वाटत असेल तर तुम्ही पुढे का नाही आलात? तुमच्याकडे सगळी सत्ता आहे. फोन टॅप करा. माझे लोकेशन ट्रेस करू शकता. एसपी दोन-दोन दिवस मालवणमध्ये बसत आहेत. पुरावे समोर आणा ना. तेव्हा तुमचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटपात बिझी होते. याचाही विचार करा.

समोरच्यांनी साधा वकीलही पाठवला नाही

शिल्पा खोत यांच्या जातीच्या दाखल्या संदर्भात आज माझ्या वकिलांशी बोलणार आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शिल्पा खोत यांच्या विरोधात कोर्टात गेलो आहे. काल कोर्टाची पहिली तारीख झाली. समोरच्यांनी साधा वकीलही पाठवला नाही. हा कुठचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास. आपला निवडणूक फॉर्म रद्द होणार हे माहीत असल्यामुळे त्यांनी वकील पाठविलेला नसल्याचे राणे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 29-11-2025