Ditwah cyclone: ‘दित्वाह’ चक्रीवादळ आता भारताच्या दारात.. हाय-अलर्ट जारी!

शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठा विध्वंस घडवून आणल्यानंतर, ‘दित्वाह’ या प्रचंड शक्तिशाली चक्रीवादळाची एंट्री आता भारतामध्ये होत आहे. या वादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत ५६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, अजूनही २१ लोक बेपत्ता आहेत.

आता या वादळाचा परिणाम भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर दिसणार असल्यामुळे, हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळ या राज्यांसाठी हाय-अलर्ट जारी केला आहे. विशेषतः, उत्तर तमिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश च्या किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

काय आहे ‘दित्वाह’चा अर्थ?

बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे या वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. या वादळाला दिलेल्या ‘दित्वाह’ या नावाचा अर्थ खूपच खास आहे.’दित्वाह’ या शब्दाचा अर्थ ‘खाडी’ असा आहे. हे नाव यमन या देशाने, वादळांना नाव देण्याच्या नियमांनुसार सुचवले होते. यमनच्या सोकोट्रा बेटावर असलेल्या ‘दित्वाह खाडी’च्या नावावरून या वादळाला ‘दित्वाह’ असे नाव देण्यात आले आहे. ही खाडी तिच्या खास किनारी परिसंस्थेसाठी जगभर ओळखली जाते.

धोक्याची घंटा! ३० नोव्हेंबरपासून मोठा फटका…

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ ३० नोव्हेंबर रोजी तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात जोरदार ते अति-जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: रविवारी चेन्नई शहरात अति-जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुढील रविवारपर्यंत समुद्रामध्ये मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारताने मदतीचा हात दिला!

श्रीलंकेत झालेल्या या विनाशकारी नुकसानीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित मदतीची घोषणा केली आहे. ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत अत्यावश्यक सामग्री घेऊन भारताने श्रीलंकेकडे मदतीचा हात पुढे केला आहे.

वादळांना नाव देण्याची पद्धत काय?

चक्रीवादळांची नावे जागतिक हवामान संघटना आणि ट्रॉपिकल सायक्लोनवरील UN ESCAP पॅनेल यांच्या नियमानुसार ठरवली जातात. पॅनेलमध्ये असलेल्या सदस्य देशांनी सुचवलेल्या नावांच्या आधीच मंजूर केलेल्या यादीतून क्रमाने ही नावे दिली जातात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:59 29-11-2025