खेडमधील पाच उपविभागांत तब्बल सात कोटींची थकबाकी

खेड : शहरासह ग्रामीण परिसरातील पाच उपविभागांच्या वीजग्राहकांकडे तब्बल ७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या दरम्यान, केवळ खेड उपविभागातच दीड कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असून, ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी महावितरणने ७०हून अधिक विशेष वसुली पथके तैनात केली आहेत. ही पथके थकबाकीदारांच्या घरोघरी जाऊन त्वरित बिल भरण्याच्या सूचना देत आहेत. काही ग्राहकांना वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने या मोहिमेला अधिक कडक वळण देण्यात आले आहे. ग्राहकांना देयक भरणा करण्यासाठी समुपदेशन, सूचना व नोटिसा देण्याचे काम या पथकांमार्फत सुरू आहे.

पाच महिने अगोदरच मोहीम सुरू

साधारणतः दरवर्षी मार्च महिन्यात वसुली मोहीम राबविली जाते; मात्र यंदा पाच महिने अगोदरच महावितरणने मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांकडून देयक भरण्यात होत असलेल्या कुचराईमुळे महसूल संकलनावर परिणाम होत असल्याने ही मोहीम तातडीने हाती घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 29/Nov/2025