“पंतप्रधान मोदी हे पोस्टरपुरते मर्यादित नाहीत, ते जनतेच्या मनात!”; दीपक पटवर्धनांचे राजेश सावंतांना सडेतोड उत्तर

रत्नागिरी: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ कुठल्या पोस्टरपुरते मर्यादित नाहीत. त्यांनी सलग तिसऱ्यांदा देशातील जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे त्यांचा फोटो वापरला किंवा नाही, यावरून इश्यू करण्याचे काहीच कारण नाही. असे जे कोणी खोडसाळपणे करत असतील, त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल,” अशा शब्दांत भाजपचे जिल्हा संयोजक दीपक पटवर्धन यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

महायुतीवर टीका करणाऱ्या माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी आज रत्नागिरीत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी दीपक पटवर्धन यांनी मोदींचे नेतृत्व, प्रचार आणि विजयाचा विश्वास यावर भाष्य केले.

मोदींचा ‘डंका’ देशभर, जिल्हास्तरावरून बोलणे अयोग्य

पत्रकावरील मोदींच्या फोटोवरून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकताना दीपक पटवर्धन म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे जागतिक कीर्तीचे नेते आहेत. एनडीएने त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. अशा मोठ्या नेत्याच्या संदर्भात जिल्हास्तरावरून आम्ही काही बोलणे किंवा त्यांच्या फोटोवरून राजकारण करणे अजिबात उचित नाही. मोदींचे कर्तृत्व सिद्ध झालेले आहे, त्यामुळे त्यांचा फोटो वापरला नाही म्हणून लोकांच्या मनातील त्यांचे स्थान कमी होत नाही.”

शिल्पा सुर्वे १५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार

रत्नागिरीत महायुतीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असून आता अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचला आहे. यावर बोलताना पटवर्धन म्हणाले, “शहरात सर्वत्र प्रचारसभांना होणारी गर्दी लक्षणीय आहे. मतदारांची देहबोली आणि प्रतिसाद पाहता युतीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे या तब्बल १५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील, यात मला कोणतीही शंका नाही.”

राजेश सावंतांवर सूचक प्रतिक्रिया

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी अचानक भूमिका बदलून महायुतीवर टीका केली. यावर विचारले असता पटवर्धन यांनी संयत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राजेश सावंत जेव्हा जिल्हाध्यक्ष होते, तेव्हाची त्यांची भूमिका आणि आताची भूमिका यात बदल आहे. त्यांची मुलगी निवडणूक लढवत असल्याने स्वाभाविकपणे ते प्रचार करणारच. त्यामुळे त्यांच्या आताच्या भूमिकेवर मी अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”

सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली युती एकदिलानं

भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात एक दिलाने काम करत आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत असून, भाजपचे संपूर्ण संघटन पूर्ण ताकदीने युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे आहे, असा विश्वासही दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.