चिपळूण (वार्ताहर): चिपळूण तालुक्यातील बोरगाव येथे एका १९ वर्षीय तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ३० नोव्हेंबर) घडली. ओमकार मंगेश हुमणे (वय १९, रा. बोरगाव, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव असून, भरउमेदीच्या तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.२१ वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. बोरगाव येथील रहिवासी असलेला ओमकार मंगेश हुमणे हा आपल्या घराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर उभा होता. अचानक त्याला चक्कर आली आणि तो रस्त्यावर कोसळला.
हा प्रकार वाडीतील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ओमकारला गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी उपचारासाठी रामपूर येथील पाटील हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
मुलाच्या अशा अचानक जाण्याने हुमणे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मयताचे वडील मंगेश गंगाराम हुमणे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक (ADR) ६७/२०२५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 01/Dec/2025














