मुंबई : ‘मुंबईच्या जागी ‘बॉम्बे’ शब्द आहे म्हणून ज्यांना आनंद होतो ते गुलाम मानसिकतेचे आणि मेकॉलेच्या औलादीचे आहेत. मुंबईचे मराठीपण मारू पाहणाऱ्या अशा लोकांविरुद्ध आपला लढा आहे,’ असे सांगतानाच, ‘जिकडे जिकडे बॉम्बे आहे, तिकडे तिकडे मुंबई करून दाखवणारच,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रद्वेष्टयांना ठणकावले.
चारकोप येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजपच्या मराठीद्वेष्टया नेत्यांचा समाचार घेतला. मुंबई आयआयटीच्या नावात ‘बॉम्बे’ शब्द असल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे मोदी सरकारचे मंत्री जितेंद्र सिंह यांना उद्धव ठाकरे यांनी झोडपून काढले. ‘हिंदुस्थानींना मेकॉलेने गुलामीत ढकलेले नाही. मोदींच्या या अशा मंत्र्यांनी ढकलले आहे, असे ते म्हणाले.’ ‘काही संस्थांच्या नावात ‘मुंबई’ करायचे राहून गेले. आधी लक्षात आले असते तर तेही केले असते. लवकरच तेही करू, मग ते शाळेच्या नावात असो किंवा अन्य कुठल्या नावात,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तमाम मुंबईकर आमच्या पाठीशी
‘कोरोना काळात आपल्या राजवटीचा अनुभव घेणारा प्रत्येक मुंबईकर आपल्या पाठीशी आहे. त्यात अमराठी, मुस्लिम, ख्रिश्चनसुद्धा आहेत. शिवसेनेच्या हातातच मुंबई पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. मुंबईकर म्हणून आम्ही या सगळ्यांना एकत्र करत आहोत. आमच्या या प्रेमात कोणी मिठाचा खडा टाकणार असेल तर आम्ही त्याला तांदळातल्या खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
गिरगाव चौपाटीवर मालवणी महोत्सव करा
‘मराठी, मालवणी आणि कोकणी जनतेचे स्पिरिट या मालवणी जत्रोत्सवात दिसत असते. असा एक भव्य मालवणी जत्रोत्सव गिरगाव चौपाटीवर करायला हवा. त्यामुळे सर्वांना कोकणची कला, संस्कृती कळेल. कोंबडी-वडे, मासे सर्व काही या ठिकाणी असू द्या. दशावतार, लावणी चौपाटीवर झाली पाहिजे,’ असेही ते म्हणाले. अशा कार्यक्रमांत दिसणारी एकजूट कायम ठेवा. मुंबईवरचा भगवा कोण उतरवतोय तेच बघू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रधर्माचा बळी जाऊ देणार नाही!
मुंबईचा महापौर मराठी होणार का, असे विचारले असता ‘हिंदू’ होणार असे उत्तर भाजपच्या एका नेत्याने दिले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘आजपर्यंत आम्ही जे मराठी महापौर केले ते हिंदू नव्हते का? ते हिंदूच होते. आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी, देशाभिमानी हिंदू आहोत, पण त्यासाठी महाराष्ट्रधर्माचा बळी जाऊ देणार नाही. कारण देशाचे रक्षण करणारा, दिल्लीचे तख्त राखणारा, देशाशी एकनिष्ठ असा हा महाराष्ट्र आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 01/Dec/2025














