Virat Kohli World Record : विराट कोहलीने ५२ व्या वनडे शतकासह मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड

Virat Kohli World Record IND vs SA: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात उत्कृष्ट शतक झळकावलं. यासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्मासह आधी विराटने १३६ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. यानंतर विराटने उत्कृष्ट फटकेबाजी करत शतक झळकावलं. विराट कोहलीने २०२३ च्या वनडे विश्वचषकात शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रमाची बरोबरी साधली होती. आता त्याने अजून एका विक्रमात सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ४९ चेंडूत अर्धशतक, १०२ चेंडूत शतक झळकावलं होतं. यासह विराट १२० चेंडूत ११ चौकार व ७ षटकारांसह १३५ धावा करत बाद झाला. विराट कोहलीने शतक केल्यानंतर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. विराटने शतक पूर्ण करताच दोन चौकार-दोन षटकार लगावत दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूची धुलाई केली.

विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ५२वं वनडे शतक झळकावलं. सचिन तेंडुलकरने यापूर्वी एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम केला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतकं केली होती. पण या सामन्यात शतक झळकावत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडला आहे.

विराटने मास्टर ब्लास्टरचा अजून एक विक्रम मोडला
विराट कोहली आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळेस पन्नासपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. या फॉरमॅटमध्ये कोहलीचा हा भारतातील ५९ व्या वेळेस पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत, त्याने या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 01/Dec/2025