IMD Alert Maharashtra: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या थंडीमुळे हवामान पुन्हा एकदा बदलाची चिन्हे आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लाटेमुळे मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात गारठा अधिक जाणवू लागला आहे. राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
दक्षिण भारतातील विस्तृत क्षेत्रावर समुद्री सायक्लोनिक सर्कुलेशन सक्रिय असल्याने पुढील 48 तास तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरल, कर्नाटक, लक्ष्यद्वीप आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी उत्तर भारतात काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड येथे होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम परिणाम पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशवर दिसणार असून घनदाट धुक्यासह थंडीची लाट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे येत असल्याने महाराष्ट्रातही थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील किमान 7°C तापमान नोंदवण्यात आले, तर निफाड येथे 8.9°C, परभणी येथे 9.8°C, तसेच जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा येथे पारा 10°C च्या खाली घसरला आहे. पहाटे अनेक भागात दवबिंदू, धुके आणि गारठा अनुभवला जात आहे.
या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा
कोकणात मात्र तापमान तुलनेने जास्त असून, रत्नागिरी येथे मागील 24 तासांत 33°C कमाल तापमानाची नोंद झाली. तरीही मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांना आज थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही थंडी कायम राहणार आहे.
राज्यात आणखी दोन दिवस गारठा
दरम्यान, बंगालच्या उपसागरातून सरकलेले ‘डिटवाह’ चक्रीवादळ निवळल्यानंतर त्याचे अवशेष असलेले तीव्र कमी दाब क्षेत्र आता तमिळनाडू-आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ सक्रिय आहे. त्याचे केंद्र चेन्नईपासून 40 किमी पूर्व, पद्दुचेरीपासून 120 किमी ईशान्य, कुड्डालोरपासून 140 किमी ईशान्य आणि नेल्लोरपासून 190 किमी आग्नेय दिशेला होते. पुढील काही तासांत या प्रणालीची तीव्रता कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात गारठा आणखी दोन दिवस टिकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 03/Dec/2025














