राजापूर: तालुक्यातील सांगवे (घोडेपोई सडा) येथे घरकुलासाठी मंजूर झालेल्या घराचे बांधकाम साहित्य आणल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर सशस्त्र हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचा पुतण्या जखमी झाले असून, नाटे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
नेमके काय घडले?
फिर्यादी संतोष गोविंद लेंबरकर (वय ५०, रा. सध्या नालासोपारा, मूळ रा. सांगवे) यांच्या घरकुलात मंजूर झालेल्या घराच्या बांधकामासाठी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी डंपरने चिरे (दगड) आणले होते. चिरे आणल्याचा राग मनात धरून आरोपी राजेश कल्याण बांदिवडेकर, रत्नाकर कल्याण बांदिवडेकर आणि कल्याण भिवा बांदिवडेकर (सर्व रा. घोडेपाई, सांगवे) यांनी रात्रीच्या वेळी संतोष यांचे भाऊ रविंद्र लेंबरकर यांच्या घरी जाऊन वाद घातला.
काठ्या आणि कोयत्याने हल्ला
रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी हातात काठ्या आणि कोयता घेऊन आले. त्यांनी फिर्यादी संतोष यांना शिविगाळ करत हातातील दांडक्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात संतोष यांच्या उजव्या कानाच्या वरील बाजूस गंभीर दुखापत झाली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला फिर्यादींचा पुतण्या दत्ताराम शाम लेंबरकर यालाही आरोपींनी हातावर आणि पायावर दांडक्याने मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिली.
गुन्हा दाखल
याप्रकरणी संतोष गोविंद लेंबरकर यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश कल्याण बांदिवडेकर (वय ४०), रत्नाकर कल्याण बांदिवडेकर (वय ४३) आणि कल्याण भिवा बांदिवडेकर (वय ६५) या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३३, ११८(१), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नाटे पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 03/Dec/2025














