कडवई : संगमेश्वर तालुक्यातील शिवशंभो नमन नाट्य मंडळाने यंदा मुंबईच्या रंगमंचावर सादर केलेल्या बहुरंगी ‘नमन’ प्रयोगाने रसिकांची मनं अक्षरशः जिंकून घेतली. जितेंद्र महाडिक यांच्या निर्मितीखाली सजलेल्या या नाट्यप्रयोगाने पारंपरिक नमनशैलीला आधुनिकतेची साज चढवत एका वेगळ्याच कलात्मक दुनियेत प्रेक्षकांना घेऊन गेले.
संदीप सावंत लिखित ‘कंस कथा क्रोधाने तृणावर्त पेटला’ या कथानकावर उभा केलेला कृष्णतृणावर्त संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. वायुरूपात उभा ठाकलेला तृणासुर, त्याच्याशी कृष्णाचा जीवघेणा सामना आणि त्याच्या वधानंतर कंस झोपेतून दचकून उठण्याचा प्रसंग या सर्वांचे नाट्यमय सादरीकरण सभागृहात विजेचा झटका देत गेले. दरम्यान, नटखट गौळणींच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिकांची मनं मोहित केलीच; पण समाजप्रबोधनाचा संदेश देताना कलाकारांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर भाष्य करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्थेची आठवण करून दिली. कलाकारांच्या शब्दांमागील ताकद अनुभवताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय !’च्या घोषणांनी नाट्यगृह दणाणून गेले.
नमनातील ‘सुदामाची धमाल, मावशीची कमाल’ या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना हसून लोटपोट केले, तर पारंपरिक कलेचे सौंदर्य खुलवणारे कॉबडा नृत्य आणि मयूर नृत्य विशेष आकर्षण ठरले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या अभिनय नृत्याच्या ताकदीने संपूर्ण रंगमंच भारावून गेला. पारंपरिक वेशभूषा, सुरेल संगीत आणि नृत्याचा अद्भु संगम यामुळे उपस्थितांनी प्रयोगाला भरभरून प्रतिसाद दिला. शिवशंभो नमन नाट्य मंडळाच्या या कलात्मक उपक्रमाने तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 03/Dec/2025














