Ratnagiri : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य विद्याशाखेची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २५ युजी विभाग, १५ पीजी विभाग, ७ संशोधन केंद्र आहेत. मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय, युजीसीकडून मानांकन नॅक ए ग्रेड, आयएसओ मानांकन हे किताबही प्राप्त आहे. शासनाच्या विविध योजना, देणगीदारांकडून मदत यामुळे महाविद्यालयाची प्रगती अभिनंदनीय आहे. या सर्व उल्लेखनीय गोष्टींमुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यापीठाकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन पीएम उषा कोकण विभागाचे (महाराष्ट्र राज्य) समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषा अंतर्गत बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. परिषद हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे झाली. मंचावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या व पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि परिषदेचे सहनिमंत्रक डॉ. रुपेश सावंतदेसाई, डॉ. सीए. अजिंक्य पिलणकर आदी उपस्थित होते.

“वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त, आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद” परीषदेच्या सांगतेवेळी डॉ. बर्कले यांनी सांगितले की, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) ५ अंतर्गत ५ कोटीचे अनुदान ४६ महाविद्यालयांना दिले जाते. यात गोगटे महाविद्यालयाचाही समावेश आहे. वाणिज्य व्यवस्थापन हा विषय सर्वांच्या जीवनात आवश्यक आहेत. परिषदेच्या दिवशी ८८ पेक्षा जास्त विविध विषयांवरील शोधनिबंधांचे आयएसबीएन क्रमांक प्राप्त ९५० पानांचे पुस्तक प्रकाशित करणे हे कौतुकास्पद आहे. हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. ही परिषद यशस्वी झाली असून सहनिमंत्रक डॉ. सीमा कदम, डॉ. रूपेश सावंतदेसाई, अजिंक्य पिलणकर यांच्या टीमने चांगले काम केले.

रत्नागिरी नावाची फोड करताना डॉ. बर्कले यांनी परिषदेत आलेले संशोधक, मार्गदर्शक हे रत्न असून त्यांच्या गिरी म्हणजे पर्वतासारख्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना उपयोग होईल असे सांगितले. आज आपण एखाद्या मोठ्या रुग्णालयात गेलो तर तिथे डॉक्टर बिल करत नाही, त्यासाठी व्यवस्थापनाचा व्यक्ती कार्यरत असतो. त्यामुळे सर्वच क्षेत्रात या व्यवस्थापन शास्त्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले असल्याचे सांगून या परिषदेचे महत्त्व असल्याचे डॉ. बर्कले यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. पांडुरंग बर्कले यांचा सत्कार प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केला. सांगता समारंभावेळी विविध विषयांवर उल्लेखनीय असे शोधनिबंध उत्तमप्रकारे सादर करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांचा आणि मदत करणाऱ्या वाणिज्य विद्याशाखेतील सर्व प्राध्यापकांचा योग्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापक यांनी प्रातिनिधिक स्वरूपात परिषदेच्या सुयोग्य नियोजन व आयोजन, तसेच भारावून टाकणाऱ्या आदरातिथ्याबद्दल आपल्या भावना व मत व्यक्त केले. गोव्यातील म्हापसा येथील श्रीदोरा काकुलो वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयातील डॉ. कवीर शिरोडकर यांनी साधन व्यक्ती म्हणून चांगली भूमिका बजावल्याबद्दल तसेच एकूणच परिषदेच्या आयोजनामध्ये सहनिमंत्रक डॉ. रुपेश सावंतदेसई यांना मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार प्राचार्य डॉ. साखळकर यांच्या हस्ते केला. प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी घोडदौडविषयी माहिती देताना या परिषदेचे फलित आपल्याला लवकरच पाहायला मिळेल, असे सांगितले. शेवटी वंदेमातरम हे गीत सादर करून या एकदिवसीय परिषदेची सांगता झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 03/Dec/2025