नवी दिल्ली : नवीन साखर वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतातील साखर उत्पादन तब्बल 43 टक्क्यांनी वाढून 4.11 दशलक्ष टनावर गेले आहे. साखर जास्त प्रमाणात निर्माण करणाऱ्या राज्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील साखर उत्पादन या दोन महिन्यात वाढल्यामुळे एकूण उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे.
ही आकडेवारी जाहीर करताना इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने सांगितले की, गेल्या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये 2.88 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. साखर वर्ष ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते आणि पुढील वर्षाच्या सप्टेंबरमध्ये समाप्त होत असते. यावर्षी पाऊस चांगला पडला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उसाची निट निघा राखली आहे.
त्यामुळे उसापासून साखर निर्मितीचे प्रमाण वाढत असल्याची माहिती विविध भागातील साखर कारखान्याकडून उपलब्ध होत आहे. गेल्या वर्षी पहिल्या दोन महिन्यात केवळ 376 साखर कारखान्यात उत्पादन सुरू झाले होते. यावर्षी उसाची उपलब्धता जास्त असल्यामुळे 428 साखर कारखान्यात उत्पादन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन या दोन महिन्यांमध्ये 1.40 दशलक्ष टन झाले आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 1.28 दशलक्ष टन होते.
महाराष्ट्रात या दोन महिन्यात साखर उत्पादन 1.69 दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षी या दोन महिन्यात केवळ 4 लाख 60 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. ही आकडेवारी उत्साहवर्धक आहे. साखर उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यात 7 लाख 74 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या दोन महिन्यात 8 लाख 12 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते.
गुजरातमध्ये आतापर्यंत 92 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी 35 हजार टन साखरेचे उत्पादन झाले होते. उसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ झाल्यामुळे सध्या साखरेचे उत्पादन मूल्य प्रति किलोला 41.72 रुपये आहे. यावर्षी देशात 30.95 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 03/Dec/2025














