पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबरला नियोजित केली आहे. मात्र, याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली.
त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससी परीक्षा सतत पुढे ढकलल्या जातात आणि वेळेवर होत नाहीत. दि. २१ डिसेंबरला नगरपरिषद निकाल आणि त्याच दिवशी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. ही परीक्षा होणार की पुढे जाणार, याबाबत एमपीएससीने तत्काळ स्पष्टता द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. दि. २१ डिसेंबरला सहायक कक्ष अधिकारी- ०३ पदे, राज्य कर निरीक्षक-२७९ पदे, पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे यासाठी पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की नाही, याबाबत उमेदवारांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे.
१५ ठिकाणी मोठी अडचण –
राज्यातील लाखो विद्यार्थी MPSC गट ‘ब’ परीक्षेला बसणार आहेत. ही परीक्षा सर्व जिल्हा ठिकाणी होणार आहे. २१ डिसेंबर रोजी निवडणूक निकाल असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन व्यस्त असणार आहे. राज्यातील सुमारे १५ जिल्हा ठिकाणी नगरपालिका आहेत आणि तिथेच परीक्षा होणार असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सातारा, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, बीड, धाराशिव, वर्धा, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला परीक्षा आयोजित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण याठिकाणी नगरपालिका असल्यामुळे येथील निकाल प्रक्रियेत प्रशासन मोठ्या प्रमाणात व्यस्त असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाने लवकरात लवकर याबद्दल निर्णय कळवावा, अशी मागणी केली आहे.
मोठ्या जिल्ह्यांच्या ठिकाणीही अडचणी –
परीक्षेला २० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने आयोगाने सर्व तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणूक निकालाच्या दिवशीच परीक्षा असल्याने, जर जिल्हा प्रशासनाने परीक्षा घेण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले, तर आयोग त्यावर निर्णय घेऊ शकते. १५ जिल्ह्यांच्या केंद्र ठिकाणांवर नगरपालिका असल्याने दोन्ही कामे कशी पार पडणार, हा प्रश्न आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यातील तालुका ठिकाणीही परीक्षा केंद्र असल्याने तेथील प्रशासन काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण पुणे जिल्ह्याचा विचार केला तर बऱ्याचदा येथे अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने तालुक्याच्या ठिकाणीही परीक्षा केंद्र दिले जातात. त्यामुळे तालुक्यांच्या ठिकाणी नगरपालिका असल्याने तेथील प्रशासन निवडणुक निकाल प्रक्रियेत व्यस्त राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 03/Dec/2025














