दापोलीत थंडीचे प्रमाण कमी-अधिक; पारा ११ अंश सेल्सिअसवर

दापोली: दापोलीत थंडीचे प्रमाण कमी-अधिक असेच आहे. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस होते. दोन दिवसांनी पारा ११ अंश सेल्सिअसवर गेला आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. थंडीमुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला असला, तरीही वातावरणातील बदलाचे संकट कायम आहे.

गतवर्षी ३० नोव्हेंबरला किमान तापमान ८.८ अंश आणि कमाल ३१.७अंशाइतके होते. यावर्षी त्याच दिवशी तापमान जवळपास तितकेच नोंदवले गेले. रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून, स्थानिक नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हवेत गारवा वाढल्याने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

तापमानातील चढ-उतारामुळे फळबागा आणि भाजीपाल्याच्या लागवडीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. दापोली हा सागरी किनारपट्टीचा प्रदेश असूनही येथे डिसेंबर-जानेवारी महिन्यात किमान तापमान १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात दापोली परिसरात सकाळी धुके आणि गारठ्याचा अनुभव वारंवार येतो. पर्यटकांसाठी हा काळ अधिक आकर्षक मानला जात आहे; परंतु दोनच दिवसांत किमान पारा दोन अंशाने वर गेला आहे.

कृषितज्ज्ञांच्या मते, आंब्याचा उत्तम हंगाम यावा यासाठी सलग २१ दिवस तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्यक आहे; मात्र रत्नागिरी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडी जवळजवळ गायब झाली आहे. दिवसाच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने मोहोर कुजण्याची किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीची साथ थांबल्यामुळे झाडांवर नव्याने येणाऱ्या मोहोरावर थेट परिणाम होत असून, त्याची वाढ खुंटण्याची किंवा मोहोर गळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जे बागायतदार कल्टारचा वापर करत नाहीत, त्यांच्या बागांमध्ये डिसेंबर-जानेवारीत नैसर्गिकरीत्या मोहोर येण्याची अपेक्षा होती. अनेक बागांमध्ये पालवी फुटलेली आहे. काही ठिकाणी मोहोर येण्याची स्थिती आहे. सध्या पडणाऱ्या थंडीमुळे दिलासा मिळेल, असा आशावाद बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात २५ टक्के पालवी आणि ६० टक्के कलमं फूट येण्याच्या स्थितीत आहेत. हा मोहोर पौष महिन्यात येईल, अशी शक्यता आहे. या कालावधीतील मोहोर बऱ्यापैकी वांझ येत असल्याचा अनुभव आहे. यंदा मोहोर अधिक राहिला, तरीही त्यात सेटिंग किती राहील, यावर हंगामाचे चित्र राहील. – राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:29 AM 04/Dec/2025