रत्नागिरी न. प. इमारतीच्या स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशिन सीलबंद !

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचे ईव्हीएम मशिन्स रात्री उशिरा पालिकेत दाखल झाल्या. त्या तपासून घेण्यात आल्या असून, पालिकेतच ‘स्ट्राँग रूम’ बनविण्यात आली आहे. या पेट्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, बाहेर स्थानिक १० पोलिसांचे त्यामध्ये दोन अधिकारी यांचे एक पथक आणि त्याच्या आतमध्ये एसआरपीएफच्या ११ जवानांचे एक पथक, दोन स्तरांच्या सुरक्षा कड्याच्या २४ तास बंदोबस्तामध्ये या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नगर पंचायत आणि नगर पालिकांची निवडणूक झाली. त्याप्रमाणे उद्याच निकाल जाहीर केला जाणार होता. परंतु, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार नगर पंचायती आणि नगर पालिकेच्या निवडणुकांचा निकाल २१ तारखेपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ६९ मतदान केंद्रांवरील या मतदान पेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी रत्नागिरी पालिकेच्या इमारतीमध्येच स्ट्राँग रूम बनविण्यात आली आहे. केंद्रावरील येणाऱ्या मतपेट्या निवडणूक निर्णय अधिकारी व पथक तपासून त्या सिल करून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या.

त्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेत हा स्ट्राँग रुम असल्याने पालिकेबाहेरच्या पहिल्या सुरक्षा कड्यामध्ये स्थानिक १० पोलिस कर्मचारी आणि एक अधिकारी असणार आहे. त्यानंतर आतमध्ये दुसऱ्या सुरक्षा कड्यामध्ये एसआरपीएफच्या ११ जवानांची हत्त्यारबंद तुकडी असणार आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दोन पाळ्यांमध्ये २४ तास हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. मशिन बंद पडल्याच्या काही अडचणी आल्या. परंतु त्या तज्ज्ञांच्या मदतीने सुरु करण्यात आला.

मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची व्यतिरिक्त सगळीकडे सुरळीत मतदान झाले. प्रभाग १० ची २० डिसेंबरला होणार प्रभाग १० ची निवडणूक आता २० डिसेंबर रोजी होणार असून, त्या प्रभागातील नागरिकांनी नगराध्यक्षपदासाठी मतदान केले. ही निवडणूक झाल्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 04/Dec/2025