मुंबई : डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलन २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत ३१ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ७७ पदके जिंकत २८६ गुणांसह देशात चौथे स्थान पटकावले. तसेच राज्यातील १३ क्रीडापटूंनी विविध स्पर्धेत चौथे स्थान मिळवले आहे.
गतवर्षी रायपूरमध्ये झालेल्या २७व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलनामध्ये राज्याने आठवे स्थान पटकावले होते. यंदा मात्र विभागाने थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेत उत्कृष्ट प्रगती दर्शवली. या यशात राज्यातील ४ वन प्रशिक्षण संस्था आणि २ वन अकादमींतील प्रशिक्षणार्थीचा मोठा वाटा असून त्यांनी मिळवलेल्या २७ पदकांमुळे महाराष्ट्राच्या पदकांत वाढ झाली. धावणे, लांबपल्ला, रिले, मॅरेथॉन, लांब उडी, रेस वॉक, भालालाफेक, भारोत्तोलन आणि पॉवरलिफ्टिंग अशा विविध प्रकारात प्रशिक्षणार्थ्यांनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदके पटकावली.
चंद्रपूर वन अकादमीने सर्वाधिक १० पदके जिंकून आघाडी घेतली. शहापूर वन अकादमीने ६ पदके जिंकत दुसरा क्रमांक पटकावला. तसेच चिखलदरा वन अकादमीने सातत्यपूर्ण कामगिरी करत ७ पदके पटकावली. याचबरोबर अभिनंदन करण्यात आले असून या कामगिरीमुळे विभागाची एकूण क्रीडा क्षमता अधोरेखित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 05/Dec/2025














