नवी दिल्ली: सलग चौथ्या दिवशीही इंडिगोची सेवा विस्कळीत राहिली असून, देशभरातील 550 हून अधिक विमाने रद्द करण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांच्या विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या असून, देशांतर्गत आणि अंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल वाढले आहेत.
आजही देशभरातील अनेक विमानसेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. रद्द झालेल्या उड्डाणांमुळे अनेक प्रवाशांच्या प्रवास योजना विस्कळीत झाल्या असून, काहींचे सामानही गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सोशल मीडियावर इंडिगोवर टीका करणाऱ्या वापरकर्त्यांना प्रत्युत्तर देताना एअरलाइनने उड्डाण विलंबामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. “आमचे कामकाज अनेक घटकांवर अवलंबून आहे, ज्यापैकी काही आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि वेळापत्रकावर परिणाम करू शकतात. तुमच्या समजुतीबद्दल आम्ही आभारी आहोत आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू,” असे इंडिगोने म्हटले आहे.
एअरलाइन उड्डाणांच्या व्यत्ययांशी झुंज देत असताना, FDTL (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीमुळे क्रूची तीव्र कमतरता जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या 48 तासांत परिस्थिती कशी बदलली यावर एक नजर टाकूया.
किती उड्डाणे रद्द झाली?
दिल्ली – 95
मुंबई – 70
हैद्राबाद – 70
बंगळुरू – 50
विमानतळांवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणीः
शेवटच्या क्षणी विमान रद्द किंवा विलंब
चेक-इन काउंटरवर लांब रांगा
पर्यायी विमान मिळण्यात अडचण
त्याच दिवशी पुन्हा बुकिंगसाठी फारच कमी पर्याय
परतावा किंवा वेळापत्रक बदलण्यासंबंधी गोंधळ
आज कोणत्या सेवा रद्द ?
या संपूर्ण प्रकरणात आता DGCA नेही लक्ष घातले असून, इंडिगोला शक्य तितक्या लवकर सेवा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावरील आज रात्रीपर्यंतची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इतर विमानतळांवरील सेवा सध्या सुरू राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 05/Dec/2025














