चिपळूण : कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतदान यंत्रणा (ईव्हीएम) ठेवलेल्या स्ट्रॉग रूम्सच्या सुरक्षेमध्ये वाढ, नेटवर्क जॅमर बसवणे, सीसीटीव्ही कव्हरेज आणि मतमोजणीच्या दिवशी संचारबंदी लागू करण्याची मागणी चिपळूणमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या मित्रपक्षांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मतमोजणीपूर्वी मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवलेल्या स्ट्रॉग रूमची सिक्यूरिटी तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षेप्रमाणे वाढवण्यात यावी, स्ट्रॉग रूम परिसरात आणि मतमोजणी केंद्रावर कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी नेटवर्क जॅमर बसवण्यात यावे, केंद्राच्या १००० मीटर परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा उमेदवारांनी प्रवेश करू नये, तसेच मतमोजणीच्या दिवशी विश्रामगृह किंवा इतरत्र कोणत्याही प्रकारच्या राजकीय बैठका त्वरित थांबवाव्यात, मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी ईव्हीएमची पुनर्प्रशिक्षण/तपासणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार आरिफ हजवाने, इम्तियाज मुकादम, अजय भालेकर, वैशाली कदम, शैलेश टाकळे, नसरीन खडस, डॉ. नियाझ पाते, समिधा जोगळे, राहुल कांबळे, सपना पवार, राजेश केळसकर, नगमा रियाने, सुनील कुलकर्णी, साक्षी शिंदे, अॅड. अजय कांबळी, नुपुर बाचीम, राकेश दाते, युगंधरा शिंदे, सानिका टाकळे, मोहन मिरगल, उमा देसाई, गणेश फके, महाडीक, विकी नरळकर आणि कांचन शिंदे या प्रमुख उमेदवारांनी स्वाक्षरी करून हे निवेदन सादर केले आहे.
यावेळी माजी आमदार आणि आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेश कदम, फैसल कास्कर, मोहन मिरगल, निहार गुढेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चिपळूण तालुका अध्यक्ष मुराद अडरेकर, शहर अध्यक्ष रतन पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, शिरीष काटकर उपस्थित होते. बैठकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही शंका न राहता पूर्ण पारदर्शकता राखली जावी, अशी मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 06/Dec/2025














