Lanja : गवाणे- कोलधे-कोट रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

लांजा : लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा आणि एसटीसह अन्य खासगी वाहनांची सतत रहदारी असणारा गवाणे- कोलधेकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ठीकठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ताच गायब झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याखालील खडी ही वर आली आहे. त्यामुळे दुचाकी सारख्या वाहनांचे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या दहा वर्षात रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणी रस्ता बनवून देता का? अशी साद या पंचक्रोशीतील ग्रामस्थ घालत आहेत. दरम्यान, पंचक्रोशीतील ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता जि. प. बांधकाम विभागाने तातडीने याबाबत कार्यवाही करावी. अन्यथा पुढील काही दिवसात या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.

गवाणे कोलधे कोट हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरून एसटीसह अन्य खाजगी वाहनांची सतत रहदारी असते. सन २००९ मध्ये माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या विशेष प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या १३ किमीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मात्र गेल्या दहा वर्षात या रस्त्याकडे राजकीय नेत्यांबरोबरच बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्याची सद्यःस्थितीत अतिशय दूरवस्था झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरण न झाल्याने या १३ किमी रस्त्याची सद्यःस्थितीत अतिशय दूरवस्था झाली आहे. ठीकठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता देखील गायब झाला आहे. काही ठिकाणी रस्त्याखालील खडी देखील वर आली आहे. यामुळे अनेक मोटरसायकलचे अपघात देखील झालेले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे हे वाहनांच्या अपघातात कारणीभूत ठरत आहेत. एकूणच हा रस्ता वाहन चालकांसाठी अतिशय धोकादायक बनला असून तो मृत्यूचा सापळा बनला आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उघडला असून जाडी खडी वर आली आहे. एखादे अवजड वाहन गेल्यास त्याच्या टायर द्वारे खडी उडून एखादा व्यक्ती देखील जखमी होऊ शकतो इतकी गंभीर परिस्थिती आहे. एकूणच रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेमुळे कोणी रस्ता करून देतो का? अशी आर्त साद आता येथील ग्रामस्थ घालत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 06/Dec/2025