Yogesh Kadam | सायबर सुरक्षेबाबत जागरूकता हवी : योगेश कदम

दापोली : आधुनिकीकरण महत्त्वाचे आहे. आज एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी त्याचबरोबर सायबर फ्रॉडही वाढतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

तालुक्यातील जालगांव येथील सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ५ डिसेंबरदरम्यान चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून सादर केलेल्या प्रकल्पांची आमदारांनी पाहणी केली. ते म्हणाले, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आधुनिक साधनसामग्री नसताना उभारलेले किल्ले आजही भक्कम उभे आहेत.

यामागील विज्ञानाचा अभ्यास व्हायला हवा. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक लहानसहान गोष्टीत विज्ञान सामावलेले आहे. विद्याथ्यांनी हाच दृष्टिकोन घेऊन विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, महिला तालुका संघटक दीप्ती निखार्गे, दापोली नगराध्यक्ष कृपा घाग, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, समीर गुजराथी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सागवेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 06/Dec/2025