मुंबई: विकसित महाराष्ट्राचा मजबूत पाया रचला जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने वर्षभरात राज्याला शाश्वत विकासाच्या दिशेने नेले आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, उद्योगांना बळ देत राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी सांगितले.
सरकारच्या वर्षपूर्वीचे औचित्य साधून भाजपच्या वतीने आज फडणवीस सरकारचे प्रगती पुस्तक मांडण्यात आले. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी राज्याची स्थिरता, विकासाचा वेग आणि परिणामकारक प्रशासनाचा एक मजबूत असा हा वर्षभराचा प्रवास असल्याचे सांगितले. सरकारने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे मापदंड स्थापित केले आहेत. कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांत क्रांतिकारक निर्णय घेत सरकारने पारदर्शक आणि गतिमान कारभाराचा आदर्श निर्माण केल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक आदी उपस्थित होते.
राज्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केली असून अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. पीककर्ज वसुलीला स्थगिती आणि पीकविमा भरपाईत गती आणली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला ‘कृषी’चा दर्जा देऊन या क्षेत्राला बळकटी दिली आहे. सिंचन क्षमता वाढवण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली असून, ‘जलयुक्त शिवार २.०’ अंतर्गत वर्षभरात ३७ हजारांहून अधिक कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
गरिबांसाठी घरे, मालमत्ता रक्षण, पर्यावरण संरक्षण, विद्यार्थी हित, विस्थापिताना आधार, शासकीय कामात प्रोत्साहनासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांचे पदोन्नती, गतिमान व पारदर्शी प्रशासनासाठी दक्षता पथक व समितीसारखे कठोर निर्णय घेतले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठीचे शुल्क माफ, तुकडेबंदी रद्द करण्याचा निर्णय, गरिबांना घरकुलासाठी मोफत वाळू, डिजिटल सातबारा, ऑनलाईन सातबारा आदी निर्णयांच्या माध्यमातून सरकारने लोकांना दिलासा दिल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.
रोजगारनिर्मितीचा उच्चांक
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख उंचावला असून, दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील ८० टक्के करारांची अंमलबजावणी सुरू आहे. २०२४-२५ या वर्षात राज्यात १ लाख ६४ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली असून, ती गेल्या वर्षीपेक्षा ३४ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय, दीड लाख सरकारी नोकऱ्या आणि ४५ हजार पोलीस भरती प्रक्रियेद्वारे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम करताना, महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करणे, शक्तीपीठ महामार्ग व वाढवण बंदर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे नियोजन आणि मुंबई मेट्रोचा विस्तार यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी वीजदरात कपात करण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव महावितरणने आयोगाकडे सादर केला असून, आगामी पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 06/Dec/2025














