खाकीतील माणुसकी : सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहितेंच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव

रत्नागिरी : शहराला जोडणाऱ्या भाटे पुलावर (Bhatye Bridge) गुरुवारी रात्री एक थरारक घटना घडली. प्रेमात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका ३० वर्षीय तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्य बजावत असलेल्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या (Ratnagiri City Police) एका सतर्क पोलीस अधिकाऱ्याने वेळीच धाव घेत या तरुणाला मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणले. सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहिते (ASI Ajay Mohite) यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०४/१२/२०२५ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय तुळशीराम मोहिते (बक्कल नं. ५७६) हे भाटे चेक पोस्ट येथे आपल्या कर्तव्यावर होते. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने धावत येऊन खबर दिली की, “भाटे पुलावर एक व्यक्ती संरक्षक कठड्यावर उभी असून ती आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे.”

दुचाकीवरून धाव आणि थरारक रेस्क्यू

ही माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता, अजय मोहिते यांनी खबर देणाऱ्या व्यक्तीच्याच दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेतली. पुलावर पोहोचताच त्यांना एक तरुण पुलाच्या संरक्षक कठड्यावर बसलेला दिसला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, मोहिते यांनी अत्यंत शिताफीने हालचाल केली. संबंधित तरुणाला काही समजण्याच्या आतच त्यांनी मागच्या बाजूने जाऊन त्याला घट्ट पकडले आणि कठड्यावरून खाली खेचले.

मुलीने फसवले म्हणून…”

पोलिसांनी तरुणाला सुरक्षित जागी आणून त्याला शांत केले. चौकशी केली असता त्याने आपले नाव सांगितले. आत्महत्येचे कारण विचारले असता, “एका मुलीने प्रेमात फसवले असल्याने मी जीवन संपवण्यासाठी येथे आलो होतो,” असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि त्याला सुखरूप त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक

एका तरुणाचा नाहक जाणारा जीव वाचवल्याबद्दल सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहिते यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, डीवायएसपी निलेश माईणकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी मोहिते यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.: सहायक पोलीस उपनिरीक्षक अजय मोहितेंच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 08/Dec/2025