सावर्डे : जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग व सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रमांक तीन तथा शिक्षण विभागातील विविध शैक्षणिक विषयांवरील मार्गदर्शनासाठी शिबिराचे आयोजन गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे नुकतेच करण्यात आले. या शिबिरास रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक, नऊ तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व विषय प्रमुख उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मॅगाने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी संदेश कडव, कार्यक्रम अधिकारी रवींद्र कांबळे व गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरणाक चिपळूण उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी लोहार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने ‘माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा तीनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड यांनी ‘माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३’ संदर्भातील विविध विभाग, आवश्यक तयारी, मूल्यांकन प्रक्रिया, गुणपद्धती व स्तरांबाबत विवेचन केले. विस्तार अधिकारी संदेश कडव यांनी ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप’ या विषयावर माहिती दिली. आढावा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दीपक मेंगाने यांनी घेतला. या मार्गदर्शन शिबिराचे नियोजन व संयोजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. निवेदन सहाय्यक शिक्षक अशोक शितोळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 08/Dec/2025














