Pali BUS Stand : स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत पाली बसस्थानकाचे तिसरे सर्वेक्षण

पाली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अधिकारी गीतांजली सूर्यवंशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. या पथकाने बसस्थानक परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांची पाहणी करत प्रवाशांबरोबर संवाद साधला.

स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या या तपासणी सर्वेक्षणावेळी अॅड. सागर पाखरे, पोलिसपाटील अमेय वेल्हाळ यांनी अभिप्राय नोंदविले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप गराटे, लांजा आगार वाहतूक नियंत्रक ललित आयरे, पाली बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, एसटी कर्मचारी, प्रवासी मित्र उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून पाली
बसस्थानकाचे गतवर्षी नूनीकरण करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. याठिकाणी सुसज्ज अशी वास्तू उभी करण्यात आली आहे. त्यामुळेच पहिल्या सर्वेक्षणात ब वर्ग प्रकारात या बसस्थानकाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पाली बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे व मध्यवर्ती असल्याने कायमच प्रवाशांची रेलचेल असते. त्यामुळे या बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसस्थानक आवारात पे अँड पार्किंग व सेल्फी पॉईंटचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या बसस्थानकाच्या आवारात बगीचाही प्रस्तावित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येथील एसटी परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे कोकण विभागातील प्रमुख बसस्थानक आहे. मुंबई-गोवा आणि मिन्या-नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्यामुळे याठिकाणी कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. हे लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी येथील नूतनीकरण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पहिल्या सर्वेक्षणात हे बसस्थानक दुसऱ्या क्रमांकावर आहे- यशवंत कानतोडे, यंत्र अभियंता, कोल्हापूर विभाग

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 08/Dec/2025